काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेस गावागावांत मोठा प्रतिसाद उत्तर महाराष्ट्रात आमदार बाळासाहेब थोरातांनी घेतल्या सभा


नायक वृत्तसेवा, संगमनेर
विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात व वाडीवस्तीवर काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेत युवकांसह, नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभाग झाल्या असून या जनसंवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात देवकौठे, निमोण, तळेगाव या विविध गावांमध्ये काँग्रेस पक्षाची जनसंवाद यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. तरुणांचा सहभाग व घोषणांचा जयजयकार यामुळे पदयात्रा लक्षवेधी ठरल्या. देवकौठे येथील पदयात्रेत भारत मुंगसे म्हणाले, देशात निर्माण झालेली अस्थिरता, महिलांवरील वाढते अत्याचार, वाढलेली महागाई आणि तरुणांचा भ्रमनिरास होऊन मोठ्या प्रमाणात आलेली बेरोजगारी यामुळे संपूर्ण देशभरात अस्वस्थता आहे. केंद्र व राज्य सरकार हे फक्त जाहिरातबाजी आणि घोषणाबाजी करत आहे. अद्याप त्यांची एकही घोषणापूर्ती झाली नसून नवनव्याने मोठमोठ्या घोषणा दिल्या जात आहेत. या विरोधात काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात जनसंवाद पदयात्रा होत आहे.

सुभाष सांगळे म्हणाले, राज्यभरासह संगमनेर तालुक्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीनसह इतर खरिपाची पिके पूर्णतः वाया गेली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून पिण्याच्या पाण्याची टंचाई व चार्‍याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी आमदार थोरात यांनी सरकारकडे सातत्याने मागणी केली असून सरकारने अद्यापही कोणतीही कार्यवाही केली नाही. दरम्यान, निमोणमध्ये बी. आर. चकोर, धांदरफळ गटात रामहरी कातोरे, साकूरमध्ये शंकर खेमनर यांसह विविध गावांमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांनी पदयात्रेत सहभाग घेतला.

उत्तर महाराष्ट्रात जनसंवाद यात्रा
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, संगमनेर, अकोले, जळगाव, रावेर, नंदुरबार, धुळे या विविध ठिकाणी सभा घेतल्या असून या सर्व सभांना व पदयात्रांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यानिमित्ताने आमदार थोरात यांच्यासारखे सुसंस्कृत नेतृत्व हे संगमनेर तालुक्याचे व जिल्ह्याचे भाग्य असल्याचे नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक भागवत आरोटे म्हणाले.

Visits: 4 Today: 1 Total: 23120

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *