वृत्तपत्र विक्रेते बाळासाहेब कुलकर्णी अनंतात विलीन संगमनेरच्या वृत्तपत्रसृष्टीचा खांब कोसळला; वयाच्या नव्वदीत घेतला अखेरचा श्‍वास..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील जाणते वृत्तपत्र विक्रेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे कडवे पाईक बळवंत विठ्ठल तथा बाळासाहेब कुलकर्णी (वय 90) यांचे गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास अल्प आजाराने निधन झाले. जून्या संगमनेर बसस्थानकात अनेक वर्ष वृत्तपत्र विक्रीचा स्टॉल चालवून त्यांनी आपल्या संसाराला आकार दिला. साधी राहणी, उच्च विचार आणि आदर्श संस्कार या त्रिसुत्रीवर त्यांचे जीवन आधारीत होते. गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असल्याने त्यांच्यावर घरातच वैद्यकीय उपचार सुरु होते. त्यातच गुरुवारी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. संगमनेरात त्यांना ब.वि.कुलकर्णी म्हणून ओळखले जात.

अतिशय शिस्तप्रिय असलेल्या कुलकर्णी यांनी तारुण्यावस्थेत असतांनाच वयाच्या अवघ्या तेराव्या-चौदाव्या वर्षी त्यांचा परिस्थितीशी संघर्ष सुरु झाला. संगमनेरात येणार्‍या विविध वृत्तपत्रांच्या वितरणाचे काम त्यांनी स्वीकारले होते. त्यातूनच भल्या पहाटे चार वाजताच त्यांचा दिवस सुरु व्हायचा. पहाटे बसस्थानकात येणाऱ्या वृत्तपत्रांचे गठ्ठे बस अथवा टॅक्सीमधून उतरवून त्यात पुरवण्या टाकण्याचे काम सुरु व्हायचे, त्यानंतर घरोघरी वृत्तपत्र टाकण्यासाठी त्यांच्याकडे सेवेत असलेल्यांना ते वृत्तपत्रांचे गठ्ठे देवून त्यांना रवाना करीत, दरम्यानच्या काळात बसस्थानकावरील आपल्या पेपर स्टॉलमध्ये वृत्तपत्र घेण्यासाठी येणार्‍या ग्राहकांचेही ते समाधान करीत.

स्टॉलवर बसण्यासाठी कोणी आले की ते आपल्या सायकलच्या हँडलला दोन पिशव्या बांधून गावात स्वतः वृत्तपत्र वितरणाचेही काम करीत असतं. 1950 सालच्या आसपास सुरु झालेला त्यांचा हा प्रवास नवीन बसस्थानकाच्या इमारतीपर्यंत म्हणजेच अगदी 2019 पर्यंत सलग 75 वर्ष सुरु होता. नव्या बसस्थानकाची रचना करतांना अंतर्भागात पेपर स्टॉलची रचनाच केली गेली नाही, त्यामुळे त्यांनी नव्या बसस्थानकाची इमारत पूर्ण झाल्यानंतर आपल्याकडील विविध वृत्तपत्रांच्या व मासिकांच्या असलेल्या एजन्सी त्यांच्याकडे काम करणार्‍यांना देवून टाकल्या आणि जवळपास आठ दशके सुरु असलेला वृत्तपत्र विक्रीचा त्यांचा प्रवास थांबला.

ब.वि.कुलकर्णी हे कडव्या शिस्तीचे म्हणून परिचित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा पगडा होता. सुरुवातीपासूनच त्यांच्यावर हिंदुत्त्ववादी विचारांचा प्रभाव असल्याने जनसंघापासून ते भारतीय जनता पार्टीपर्यंत ते त्याच पक्षाचे समर्थक राहीले. आंतरराष्ट्रीय पातळीपासून अगदी गावपातळीवरील समाजकारण, राजकारण, शिक्षण आणि संस्कृती यावर त्यांचा गाढा अभ्यास होता. संगमनेरातील नवपत्रकारांना त्यांचा सहवास म्हणजे विचारांची पर्वणीच असत. त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते व्यवहारात अत्यंत चोख आणि प्रामाणिक होते. त्यांनी कधीही कोणाकडून एक नवा रुपया अधिक घेतला नाही, आणि कोणाला तो दिलाही नाही.

त्यांच्या रुपाने संगमनेरच्या वृत्तपत्रसृष्टीचा जाणता खांब कोसळला आहे. त्यांच्या पश्‍चात मुलगा विवेकराव, सून, मुलगी गौरी व नातवंडे असा परिवार आहे. आज सकाळी 11 वाजता संगमनेरच्या अमरधाममध्ये त्यांच्यावर वैदीक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील सर्वस्तरातील नागरीकांसह वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरीकांची मोठी उपस्थिती होती.

Visits: 105 Today: 2 Total: 1098949

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *