कोळपेवाडी येथील शिक्षिका बनली पोलीस उपनिरीक्षक राज्यात मुलींमध्ये प्रथम येण्याचाही पटकावला बहुमान


नायक वृत्तसेवा, कोपरगाव
अध्यापनाचे आणि प्रपंपाचा गाडा अशी दुहेरी जबाबदारी असतानाही केवळ जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर थेट राज्यात मुलींमध्ये पहिली येऊन पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातलीये. ही किमया कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील शिक्षिका सुरेखा रमेश बिडगर यांनी केली आहे.

नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमिक विद्या मंदिरात सुरेखा बिडगर अध्यापनाचे काम करत होत्या. मात्र, अधिकारी होण्याचं स्वप्न काही स्वस्थ बसू देत नव्हतं. अखेर सुरू झाला संघर्षाचा प्रवास. अध्यापनाची महत्त्वाची जबाबदारी निभावत असतानाही कुटुंबाचा गाडा हाकत असताना मोठी कसरत व्हायची. तरी देखील जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर लढण्याचा निर्धार केलेला असल्याने हा प्रवास निरंतर चालू झाला. शेवटी सन 2020 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि त्यात थेट राज्यात मुलींमध्ये प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.

त्यांचे शालेय शिक्षण चांदवड तालुक्यातील उसवाड येथे झालेले आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण नेमीचंद कनिष्ठ महाविद्यालय चांदवड येथे पूर्ण केल्यानंतर आई-वडिलांनी त्यांचा विवाह केला. परंतु बालवयापासून शिक्षणाची आवड असल्याने लग्न झाल्यानंतरही त्यांनी आपले पुढील शिक्षण चालू ठेवले. कुटुंबाची सर्व जबाबदारी पार पाडत त्यांनी सुशीलामाई काळे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गौतमनगर कोळपेवाडी येथून पुढील शिक्षण घेतले. त्यांनी भूगोल विषयात प्रथम श्रेणीत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर बीएड शिक्षण पूर्ण करून शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षा त्यांनी आत्तापर्यंत दोनवेळा उत्तीर्ण केली आहे. कोणतीही शिकवणी न लावता केवळ फक्त स्वयंअध्ययनाच्या जोरावर त्यांनी हे यश प्राप्त केले आहे. असंख्य तरुणांसाठी त्यांचे हे यश नक्कीच प्रेरणादायी ठरणारे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *