आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येलाही संगमनेरात गोवंशाच्या कत्तली? मिळालेल्या माहितीवरुन ‘साप’ सोडून ‘भूई’ धोपटीत पोलिसांनी सोडविली ‘तेरा’ गोवंश जनावरे..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
बहुसंख्य समुदायाच्या आस्थेचा विषय असलेल्या आषाढी एकादशीला कोणत्याही जनावराची कत्तल करु नये असा राज्यात प्रघात आहे. भारतीय परंपरेच्या अनुषंगाने एकमेकांच्या धर्म आणि परंपरेचा आदर करण्याची आपली संस्कृती आहे. मात्र संगमनेरातील कसायांना या संस्कृतीपेक्षा आपल्या तुंबड्या भरण्यातच अधिक रस असल्याचे आषाढीच्या पूर्वसंध्येला शहर पोलिसांच्या कारवाईतून उघड झाले आहे. विशेष म्हणजे किमान आजच्या दिवशी संगमनेरात कोणत्याही जनावराची कत्तल होवू नये यासाठी पालिकेसह पोलिसांनीही मांस विक्रेत्यांना तशा सूचना दिल्या होत्या. मात्र येथील कसायांना कायदे आणि नियम लागू होत नसल्यागत स्थिती असून चक्क वारकरी सांप्रदायाच्या वर्षभरातील सर्वात मोठ्या परंपरेच्या दिनीच गोमाता म्हणून पूजल्या जाणार्या तब्बल तेरा गोवंश जनावरांची कसायांच्या दावणीतून सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी ‘अज्ञात’ कसायाविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आषाढीच्या
पूर्वसंध्येला सोमवारी (ता.19) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कत्तलखान्यांचा कुप्रसिद्ध परिसर म्हणून आता अवघ्या महाराष्ट्राला परिचयाच्या झालेल्या संगमनेरातील जमजम कॉलनी भागातील अकरा क्रमांकाच्या गल्लीत सदरचा प्रकार समोर आला. पोलिसांना काही ‘गोप्रेमी’ नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सदर ठिकाणी छापा घातला असता वसाहतीच्या पूर्वेकडील बाभळीच्या काटवनातून गोवंश जनावरांच्या हंबरण्याचा आवाज पोलिसांच्या कानी पडला. या परिसराची झाडाझडती घेतली असता बाभळीच्या आडोशाने अज्ञात कसायाने अनेक जनावरे अक्षरशः निर्दयीपणाने आणि विना चारा-पाण्याची बांधून ठेवल्याचे पोलिसांना आढळले.

सदर जनावरांच्या मालकाचा शोध घेण्याचाही पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र हा संपूर्ण परिसरच गोवंश जनावरांच्या कत्तलीसाठी ओळखला जात असल्याने
या भागातील नागरिकांनी तोंडावर बोट ठेवण्यातच समाधान मानले. त्यामुळे पोलिसांना नेमक्या गुन्हेगारापर्यंत पोहोचता आले नाही. या सर्व जनावरांची मोजदाद केली असता त्यात नऊ गायी, तीन गोर्हे व एक बैल अशी दोन लाख 22 हजार रुपये किंमतीची एकूण तेरा जनावरे कत्तलीच्या हेतूने बांधून ठेवलेली आढळली. त्यासर्व जनावरांना खासगी वाहनातून सायखिंडीतील जीवदया गोरक्षणात पाठविण्यात आले. यानंतर पोलिसांनी परिसरात तपासणी मोहीमही राबविली. मात्र पोलीस आल्याची पूर्वसूचना मिळालेली असल्याने बहुतेक कसायांनी आपापल्या वाड्यांचे दिवे मालवून परिसरात सगळं काही अलबेल असल्याचे चित्र निर्माण केले. त्यामुळे ‘पक्की’ माहिती मिळालेल्या वरील तेरा जनावरांशिवाय पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.

या प्रकरणी पो.कॉ.सचिन उगले यांच्या फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलिसांनी अज्ञात कसायाविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1965 च्या सुधारीत 1995 च्या कलम 5 (अ), 1, 9, तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागणूक देण्यास प्रतिबंध करणार्या कायद्याचे कलम 3, 11 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो.ना.लबडे यांच्याकडे देण्यात आला आहे. या कारवाईने पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी आषाढीच्या पार्श्वभूमीवर कत्तलखाने बंद ठेवण्याच्या दिलेल्या सूचनांचीही संगमनेरच्या कसायांनी कत्तल केल्याचे समोर आले.

संगमनेरच्या बेकायदा गोवंश कत्तलखान्यातून होणार्या गोवंश मांस तस्करीतून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असते. अनधिकृत माहितीच्या आधारे येथील कत्तलखान्यात दररोज सुमारे शंभर ते सव्वाशे गोवंशाची कत्तल होते व त्यांचे मांस संगमनेरसह मुंबई, मालेगाव, औरंगाबाद व कर्नाटकातील गुलबर्ग्यापर्यंत अगदी सहज पोहोचवले जाते. यामागे लाखो रुपयांचे अर्थकारण असून राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यापासूनच संगमनेर पोलीस आणि संगमनेरातील बेकायदा कत्तलखाने सतत चर्चेत आहेत. आजवर पोलिसांनी शेकडोंवेळा या कत्तलखान्यांवर छापे घातले आहेत. शेकडो जणांवर गुन्हे दाखल करुन असंख्य जनावरे जीवंत सोडली आहेत आणि हजारो किलो गोवंश मांसाची विल्हेवाटही लावली आहे. मात्र या उपरांतही शहरातील कत्तलखान्यांची संख्याही कमी झालेली नाही आणि येथील कत्तल होणार्या जनावरांमध्येही घट झालेली नाही. त्यामुळे पोलिसांची कारवाई म्हणजे साप सोडून भूई धोपटण्याचाच प्रकार असल्याची चर्चा शहरात आहे.

संगमनेरात गोवंश जनावरांची कत्तल करणारे बेकायदा दहा वाडे आहेत. या वाड्यांमध्ये दररोज मोठ्या संख्येने गोवंश जनावरांच्या रक्ताचे पाट वाहतात. येथील बहुतेक सर्वच वाड्यांवर पोलिसांची कारवाई झालेली आहे, मात्र आजवर संगमनेर नगर पालिकेने ही बेकायदा कत्तलीची ठिकाणे कधीही उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला नाही. पोलिसांनीही प्रत्येक छाप्यात केवळ ‘पंटर’वर कारवाई करीत मुख्य सूत्रधारांना ‘अभय’ देण्याचीच परंपरा जोपासली आहे. सोमवारी घडलेला प्रकारही याच श्रेणीत मोडणारा आहे.

