गोधेगाव येथे जनावरांनाच ठेवले विलगीकरणात…
गोधेगाव येथे जनावरांनाच ठेवले विलगीकरणात…
‘लम्पी स्किन डिसीज’ आजाराने सात जनावरे बाधित
नायक वृत्तसेवा, नेवासा
कोरोना विषाणू संसर्गामुळे एकीकडे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाची लक्षणे दिसताच तसेच बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर अनेकजण स्वतःहून विलगीकरणात जातात. तर, काही जणांना प्रशासनाकडून सक्तीने विलगीकरण करण्यात येते. त्यात आता नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे जनावरांनाच विलगीकरणात ठेवण्याची वेळ पशुपालकांवर आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोधेगाव येथील सात जनावरे ‘लम्पी स्किन डिसीज’ या आजाराने बाधित झाली आहेत. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे त्याचा फैलाव इतर जनावरांमध्ये होऊ नये, यासाठी तातडीने बाधित जनावरांवर उपचार सुरू करण्यात आले असून त्यांचे विलगीकरण करण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाने संबंधित पशुपालकांना दिल्या आहेत. लम्पी स्किन डिसीज हा आजार दक्षिण आफ्रिकेतील जनावरांत दिसतो, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातून देण्यात आली. महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात या आजाराची लक्षणे गडचिरोली व बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामध्ये काही जनावरांमध्ये दिसली होती. आता या आजाराने बाधित झालेली जनावरे गोधेगाव भागात प्रथमच आढळली आहेत. या आजाराने बाधित झालेल्या जनावरांची संख्या सात असून आजाराचा फैलाव वेगाने होऊ नये, यासाठी तातडीने बाधित जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे ठेवण्याच्या सूचना संबंधित पशुपालकांना देण्यात आल्या आहेत.

तसेच जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे यांनी तातडीने जनावरांवर उपचार सुरू केले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात आणखी किती जनावरांना या आजाराची लागण झाली आहे, याची पाहणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. ‘लम्पी स्किन डिसीज’ या आजाराने बाधित झालेल्या जनावरांमध्ये सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे जनावरांना ताप येतो. तसेच जनावरांच्या डोळ्यातून, नाकातून स्राव गळणे, भूक मंदावणे, डोके, मान, पोट, पाठ, पाय, तसेच शेपटीखाली त्वचेवर दोन ते पाच सेंटीमीटरच्या गाठी येतात. नाक-तोंडाच्या आतील भागात गाठी आढळून येतात. ग्रंथीला सूज येणे पुढील व मागील पायावर सूज असणे, अशी लक्षणे आढळतात.

‘लम्पी स्किन डिसीज’ या आजाराचा गोधेगाव येथील सात जनावरांना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. हा आजार गाय व म्हशी यांच्यामध्ये होतो. पण आपल्याकडे मात्र ही लक्षणे फक्त गायीमध्ये दिसली आहेत. बाधित जनावरांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. या रोगाचा फैलाव बाधित पशुधनापासून डास, चावणार्या माशा व गोचीड यांच्यामार्फत होतो. उष्ण व दमट हवामानात याचा प्रसार जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे बाधित जनावरांचे विलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
– डॉ.सुनील तुंबारे (पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद)
