संगमनेर बाजार समितीमध्ये भुसार लिलाव विना आडत सुरू ः खेमनर
संगमनेर बाजार समितीमध्ये भुसार लिलाव विना आडत सुरू ः खेमनर
नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुख्य मार्केट यार्डमध्ये सोमवारपासून (ता.23) भुसार (धान्य) शेतमालाचा विना आडत खुल्या पद्धतीने जाहीर लिलाव सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सभापती शंकर खेमनर यांनी दिली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना सभापती खेमनर म्हणाले, लिलावात विक्री झालेल्या शेतमालाचे पेमेंट रोख, आरटीजीएस, धनादेशद्वारे तात्काळ शेतकर्यांना दिले जाणार आहे. तसेच शेतमालाचे योग्य व अचुक मोजमाप, कोणताही छुपा खर्च नाही, खुल्या लिलाव पद्धतीमुळे मालाचे मोल होणार, आडत बंद केल्यामुळे शेतकर्यांच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. शेतकर्यांना फक्त हमाली व मापाईसाठी होणारी रक्कम अदा करावी लागणार आहे. विशेष म्हणजे पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्ह्यातील सर्वप्रथम लुज शेतमालाची आवक संगमनेर बाजार समितीमध्ये सुरू केलेली असून त्यामध्ये शेतकर्यांचे जवळजवळ प्रति क्विंटल 100 रुपयांप्रमाणे रिकामे पोते व पोते भरणे खर्च वाचणार आहे. त्यामुळे लुज व पोते अशा दोन्ही शेतमाल आवकेला पर्याय बाजार समितीने सर्व शेतकर्यांना उपलब्ध करुन दिलेला आहे. एकाच वाहनामध्ये लुज किंवा पोते 10 किंवा त्यापेक्षा जास्त आवक शेतमाल करण्यार्या व्यापार्यांचे खळ्यावर बाजार समितीचे मार्केट यार्डपासून किमान 5 किलोमीटर अंतरावर विनामूल्य पोहोच करण्याची जबाबदारी संबंधित शेतकरी किंवा वाहनधारकाची राहील असेही बाजार समितीचे सभापती खेमनर यांनी आमचया प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. तरी शेतकर्यांनी आपला भुसार शेतमाल योग्य प्रतवारी करुन बाजार समितीमध्ये मोकळा किंवा 50 किलोच्याच गोणीमध्ये विक्रीसाठी आणावा. तसेच शेतमाल विक्रीची फसवणुक होवू नये म्हणून बाजार समितीच्या परवानाधारक व्यापार्यासच विक्री करावा असे आवाहन बाजार समितीचे सचिव सतीष गुंजाळ यांनी केले आहे.