निमगाव खुर्द येथील विवाहितेची आत्महत्या
निमगाव खुर्द येथील विवाहितेची आत्महत्या
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील निमगाव खुर्द येथील विवाहितेने सासरच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून शनिवारी (ता.10) सासरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मयत विवाहितेच्या भावाने संगमनेर तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पती, सासरा व सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूनम अमोल कासार (वय 23) असे मयत विवाहितेचे नाव आहे. तिचे निमगाव खुर्द येथील अमोल आबासाहेब कासार याच्याशी डिसेंबर 2019 मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर सातत्याने तिला सासरच्यांनी शुल्लक कारणांसह पैशांवरुन मानसिक व शारीरिक त्रास दिला. दरम्यानच्या काळात समजूत काढूनही सासरच्यांनी तिला त्रास देण्याचे चालूच ठेवले. अखेर वैतागल्याने शनिवारी तिने सासरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेत जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी विवाहितेचा भाऊ सौरभ विलास हासे (रा.चिखली) याने तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पती अमोल कासार, सासरा आबासाहेब नामदेव कासार आणि सासू अलका आबासाहेब कासार यांच्याविरोधात गुरनं.1420/2020 भादंवि कलम 498 अ, 304 ब, 323, 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस करत आहे.

