चोरट्यांचे शहाणपण; चोरलेले टायर टाकले शेतात
नायक वृत्तसेवा, घारगाव
तीन दिवसांपूर्वी चोरट्यांनी उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकचे चार टायर चोरून नेले होते. त्यानंतर पण चोरट्यांनी चारही टायर हाकेच्या अंतरावर असलेल्या एका शेतात टाकले आहे. त्यामुळे चोरट्यांना शहाणपण तरी कसे सुचले असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मालवाहू ट्रक (क्रमांक एमएच.16, सीसी.7677) हा अहमदनगर येथून शेतीचे खत घेऊन घारगाव येथील साईनाथ कृषी भंडारमध्ये आला होता. खते खाली झाल्यानंतर चालकाने ट्रक तारेच्या कंपाऊंडमध्ये लावला होता. मंगळवारी पहाटे चोरट्यांनी कंपाऊंडच्या मागील बाजूला असलेली तारेची जाळी कापून आत प्रवेश केला. त्यानंतर एका चोरट्याने पुढील बाजूस येऊन त्याठिकाणी दुचाकीला असलेले हेल्मेट घातले व त्याने बल्बची वायर कट केली. त्यामुळे अंधार झाल्याने चोरट्यांनी मालवाहू ट्रकचे चारही टायर काढून पोबारा केला. सकाळी ही गोष्ट कामगारांच्या लक्षात आल्याने त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक धिरज राऊत, गणेश लोंढे, राजेंद्र लांघे, संतोष खैरे, हरिश्चंद्र बांडे, प्रमोद चव्हाण, किशोर लाड आदिंनी घटनास्थळी धाव घेत कृषी भंडार दुकानमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यानंतर अहमदनगर येथून दुपारी श्वान पथक व ठसेतज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले. याप्रकरणी विजय गडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान गुन्हा दाखल झाल्याची माहिती चोरट्यांना समजताच त्यांनी बुधवारी (ता.27) रात्री चारही टायर एका शेतात टाकले. यावरुन हे टायर नेमकी कोणी चोरले हे शोधणे पोलिसांपुढे आव्हान असणार आहे.