अकोलेत मोबाईल दुकान फोडले; तीन लाखांचा ऐवज लंपास

नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले बसस्थानकाच्या दर्शनी बाजूस असलेल्या मातोश्री संकुलातील मोबाईल शॉपी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास फोडून अंदाजे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. यामध्ये सुमारे तीस मोबाईल, ब्ल्यूटूथ व हेडफोन यांचा समावेश आहे. या चोरीने व्यापार्‍यांत खळबळ उडाली असून, चोर्‍यांचा तपास करणे पोलिसांसमोर नवे आव्हान ठाकले आहे.

अकोले बसस्थानकाच्या दर्शनी बाजूस असलेल्या मातोश्री संकुलात समीर सय्यद यांचे मोबाईल दुकान आहे. गुरुवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात तिघा चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडले. त्यानंतर जॅकच्या सहाय्याने सेंटरलॉक तोडून दुकानात प्रवेश केला. सुमारे दहा ते पंधरा मिनिटांत दुकानातील तीस विवो कंपनीचे मोबाईल, ब्ल्यू टूथ व हेडफोन असा अंदाजे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले. कोल्हार-घोटी राज्यमार्गावरुन दिसणार्‍या व मोकळ्या जागेत दुकानात धाडसी चोरी करुन चोरट्यांनी पोलिसांना आव्हानच दिले आहे. नुकतेच अकोले पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतलेले पोलीस निरीक्षक अभय परमार हे गुन्ह्यांची उकल करण्यात माहीर असल्याने लवकरात लवकर तपास लावून चोर्‍यांवर नियंत्रण मिळावे अशी अपेक्षा अकोलेकरांनी व्यक्त केली आहे.

Visits: 190 Today: 1 Total: 2167689

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *