पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरु होती निमगाव जाळीत ‘गुटखा’ तस्करी! निमगाव जाळी जिल्ह्यातील गुटखा तस्करीचे प्रमुख केंद्र असल्याबाबत दैनिक नायकच्या वृत्तावर अखेर शिक्कामोर्तब


नायक वृत्तसेवा, संगमनेर
आठवड्याभरापूर्वी श्रीरामपूर पोलिसांनी एकलहरे येथील एका शेतात असलेल्या गोदामावर छापा घातला होता. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 54 लाखांचा गुटखाही जप्त केला होता. या गोरखधंद्याचे धागे संगमनेर, राहाता, अकोले, लोणी व श्रीगोंद्यापर्यंत पसरल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथील एका गोदामावर छापा घालीत गुटख्यासह 20 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केल्याने जिल्ह्यातील गुटखा तस्करीचे केंद्र ‘निमगाव जाळी’च असल्याच्या दैनिक नायकच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. अर्थात एकलहरे येथील छाप्यानंतर राहाता तालुक्यातील निमगाव निघोज व संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी ही दोन ठिकाणे जिल्ह्यातील गुटखा तस्करीचे मुख्य केंद्र म्हणून समोर येवूनही येथील मुख्य संशयित आरोपी मात्र अद्यापही पोलिसांपासून दूर असून गांजा तस्करीप्रमाणेच या प्रकरणाचा तपास सुरु असल्याने त्यातून संशयाचा धूर दिसू लागला आहे.


राज्यात सुगंधी तंबाखू व सुपारीचे मिश्रण या स्वरुपातील गुटख्यासह सुगंधीत तंबाखू आणि गुटख्याच्या उत्पादन, साठवणूक व विक्रीवर निर्बंध लागू आहेत. तरुण पिढीच्या भविष्याचा विचार करुन राज्यात गुटखा बंदीचा निर्णय लागू करतांना सरकारने त्यातून मिळणार्‍या हजारों कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडले होते. सरकारच्या या निर्णयामूळे राज्यात गुटखा विक्री बंद होईल असे अपेक्षित असतांना ती पूर्वीपेक्षा अधिक स्वरुपात फोफावली. त्यातून सरकारी तिजोरीत पडणारा महसुल बंद झाल्याने शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. मात्र राज्यात गुटखाबंदी लागू झाल्यापासून गुटख्याची तस्करी रोखण्याची जबाबदारी असलेल्या घटकांनी ‘गुटखा तस्करां’शी हातमिळवणी केल्याने बंदीतही गुटखा सर्वत्र राहीला.


आठवड्याभरापूर्वी श्रीरामपूर पोलिसांनी तेथीलच एकलहरे परिसरातील एका शेतात असलेल्या गोदामावर छापा घातला होता. या छाप्यात पोलिसांच्या हाती तब्बल 54 लाखांचा गुटखा लागला. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत राहाता तालुक्यातील निमगाव निघोज परिसरातील साहिल विजय चोपडा व वैभव शांतीलाल चोपडा या काका-पुतण्यांसह फिरोज पठाण, सलमान तांबोळी व करीम शेख यांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून गुटखा तस्करीचा ओघळ थेट संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळीपर्यंत येवून पोहोचल्यानंतर दोन दिवसांपूर्वी श्रीरामपूर पोलिसांनी निमगाव जाळीतही छापा घातला होता. यावेळी पोलिसांना चार लाखाच्या गुटख्यासह तब्बल 20 लाखांचा मुद्देमाल हाती लागला, तर गुरुवारी एकलहरे परिसरातील अन्य एका बंद गोदामावरील छाप्यातून पुन्हा 11 लाखांचा गुटखा हस्तगत करण्यात आला.


या प्रकरणात जिल्ह्यातील सर्वात मोठे गुटखा माफिया म्हणून समोर आलेल्या संगमनेर तालुक्यातील निमागव जाळी येथील संतोष डेंगळे व निमगाव निघोज (ता.राहाता) येथील विजय चोपडा हे दोघे मात्र सोयीस्करपणे ‘गायब’ झाले आहेत. दैनिक नायकने गेल्यावर्षी 11 जूनरोजी आश्वी पोलिसांच्या नाकावर टिच्चून ‘निमगाव जाळीतून’ जिल्हाभर गुटख्याचा पुरवठा होत असल्याचे वास्तव समोर आणले होते. मात्र निमगाव जाळीत येणारा गुटखा थेट कर्नाटक राज्यातील निपाणी येथून संगमनेरपर्यंत अगदी सहीसलामत पोहोचत असल्याने या धंद्यात हात ओले होणार्‍यांची संख्याही स्पष्ट झाली. त्यामुळे त्या प्रकरणात वास्तव समोर येवूनही कोणतीही कारवाई झाली नव्हती. आता मात्र त्यावेळी दैनिक नायकने उघड केलेल्या आरोपीचे नाव समोर आले असून तो सध्या पसार झाला आहे.


तर अगदी नियुक्तीपासूनच सतत चर्चेत राहीलेल्या श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी गुरुवारी श्रीरामपूर, अकोले, लोणी व श्रीगोंदा परिसरातील जवळपास 25 जणांना चौकशीसाठी बोलावले होते, मात्र नंतर त्यांना कोणत्याही कारवाईशिवाय सोडून देण्यात आले. त्यामुळे या प्रकरणातील संशय वाढला असून इतक्या मोठ्या संख्येने संशयितांना बोलावून सोडून देण्यामागे मोठे अर्थकारण दडले असण्याची शक्यता आता व्यापारी वर्गातूनही वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी सापडलेल्या गांजा तस्करांच्या प्रकरणाचेही असेच झाले असल्याने या प्रकरणात संशय घेण्यास पुरेसा वाव आहे.

निमगाव जाळी येथील संतोष डेंगळे हा संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठा गुटख्याचा तस्कर असून निम्म्याहून अधिक जिल्ह्यात त्याच्याकडून गुटख्याचा पुरवठा केला जात असल्याचे वेळोवळी समोर आले आहे. याबाबत दैनिक नायकने गेल्या वर्षी 11 जूनरोजीच्या ठळक वृत्तातून प्रकाशही टाकला होता. डेंगळे याने तालुकानिहाय अनेक छोट्या-मोठ्या वितरकांची साखळी निर्माण केली असून श्रीरामपूर पोलीस आता त्या साखळीतील एकेकाला बोलावून तडजोडी करीत असल्याचे गुरुवारच्या प्रकरणावरुन समोर आल्याची चर्चा सध्या सुरु आहे. मात्र पो.नि.बहिरट यांनी मात्र चौकशी करण्यात आलेल्यांपैकी दहा जणांना साक्षीदार करणार असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणाचा प्रामाणिक तपास झाल्यास जिल्ह्यातील गुटखा माफियांचे साम्राज्य उध्वस्त होणार हे मात्र निश्चित आहे, पण त्यासाठी पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास करुन कारवाई करण्याची गरज आहे.


गेल्या काही वर्षांपासून संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी गुटखा तस्करीचे जिल्ह्यातील मोठे केंद्र म्हणून उदयास आले आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरु असलेल्या या व्यापक गुटखा तस्करीची आश्वी पोलिसांना माहिती नव्हती असे म्हटल्यास कोणीही त्यावर विश्वास ठेवणार नाही. आता मात्र या प्रकरणात संबंधिताचे नाव समोर आल्याने तालुक्यात त्याने विणलेले गुटखा तस्करीचे संपूर्ण जाळे उध्वस्त होण्याची गरज आहे. अन्यथा मोठे मासे जगवण्यासाठी छोटे मासे मरीतच राहतील आणि मोठा मासा दिवसोंदिवस मोठाच होत राहील.

Visits: 110 Today: 2 Total: 1105841

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *