महापुरामुळे बाधित व्यावसायिकांना 95.40 लाखांची मदत जाहीर कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्याला यश

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
सन 2019 ला कोपरगाव शहरातील व्यावसायिकांना आलेल्या महापुराच्या पाण्याचा फटका बसून या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले होते. आमदार आशुतोष काळे यांनी त्या व्यावसायिकांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या मदत व पुनर्वसन खात्याकडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश मिळाले असून मदत व पुनर्वसन खात्याने महापुरामुळे बाधित झालेल्या 324 दुकानदार, टपरीधारक व हातगाडीधारक व्यावसायिकांना 95.40 लाखांची मदत जाहीर केली असल्याची माहिती आमदार काळे यांनी दिली आहे.

ऑक्टोबर 2019 मध्ये संपूर्ण कोपरगाव तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत खरीपाच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. तसेच धरण क्षेत्रात देखील मोठ्याप्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे गोदावरी नदीला जवळपास 80 हजार क्युसेसवरून 3 लाख क्युसेसपर्यंत पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे गोदावरी नदीला महापूर आला होता. या महापुराचे पाणी कोपरगाव शहरात शिरल्यामुळे अनेक दुकानदार, टपरीधारक व्यावसायिकांच्या दुकानात पाणी जाऊन त्यांचे देखील मोठे आर्थिक नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करण्याच्या सूचना आमदार आशुतोष काळे यांनी त्यावेळी प्रशासनाला दिल्या होत्या. प्रशासनाने रीतसर पंचनामे करून झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे तातडीने सादर केला होता. यापूर्वी खरीप पिकाचे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आमदार काळे यांनी पहिल्या टप्प्यात 8.28 कोटी व दुसर्या टप्प्यात 19 .67 कोटी अशी एकूण 27.95 कोटी रुपयांची भरपाई मिळवून दिलेली आहे.

या व्यावसायिकांना देखील नुकसान भरपाई मिळावी यासाठी मदत व पुनर्वसन खात्याकडे त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याचे अपेक्षित फळ मिळाले असून नुकसान झालेल्या या व्यावसायिकांना शासनाकडून 95 लाख 40 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जाहीर केले आहे. ही नुकसान भरपाईची रक्कम लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे आमदार काळे यांनी सांगितले आहे.

Visits: 91 Today: 1 Total: 1098459

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *