‘पाचोरे हॉस्पिटल’चे जुने हंगरगेकर हॉस्पिटलमध्ये स्थलांतर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आरोग्य सेवेत अल्पावधीतच यशोशिखरावर पोहोचलेल्या ‘पाचोरे हॉस्पिटल’ने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहरातील पोफळे मळा येथील जुने हंगरगेकर हॉस्पिटलच्या इमारतीत स्थलांतर केले. तंत्रज्ञानाच्या युगात अत्याधुनिक सोयी-सुविधांसह विश्वासार्ह सेवेसाठी पुन्हा एकदा पाचोरे हॉस्पिटल सज्ज झाले आहे.

नवीन इमारतीत स्थलांतर केल्यानंतर हॉस्पिटलचा शुभारंभ प्रथितयश शल्यविशारद तथा आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या हस्ते झाला. यावेळी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, नगरसेवक हिरालाल पगडाल, जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे, डॉ.वसंत हंगरगेकर, प्रशांत पाचोरे, ललीता पाचोरे आदिंसह हितचिंतक उपस्थित होते. याप्रसंगी डॉक्टर पाचोरे दाम्पत्य लिखित स्त्री रोगाविषयक मार्गदर्शक पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.विशाखा पाचोरे यांनी करुन हॉस्पिटलद्वारे उपलब्ध असलेल्या सेवा-सुविधांविषयी माहिती दिली. शेवटी प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.विकास पाचोरे यांनी आभार मानले.
