गोडगोड आवाजाच्या मुलींनी केली संगमनेरातील एकाची आर्थिक फसवणूक! लॉकडाऊनमधील विरंगुळा भोवला; अडीच लाखांहून अधिक रकमेला लागला चुना..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जगात डिजिटल क्रांती झाल्यानंतर प्रत्येकाच्या हाती मोबाईल आणि त्यात अमर्यादीत इंटरनेट अ‍ॅसेस मिळाल्याने त्याच्या चांगल्या व वाईट परिणांमाची दृष्यचित्र वेळोवेळी समोर येत असतात. आधुनिक युगातील या स्थित्यंतराने एकीकडे जगाला कवेत घेण्याचे सामर्थ्य निर्माण केलेले असतांना दुसरीकडे या स्थित्यंतराचा गैरफायदा घेवून लोकांची आर्थिक फसवणूक करणार्‍या गुन्हेगारांच्या शेकडो टोळ्याही देशात निर्माण केल्या आहेत. कोविड संक्रमणाच्या कालावधीत तर अशा असंख्य टोळ्यांनी घरबंदीत असलेल्यांच्या नैराश्याचा नेमका फायदा घेत त्यांची मोठी आर्थिक फसवणूक केल्याचे असंख्य प्रकार नंतरच्या काळात समोर येवू लागले. असाच प्रकार आता संगमनेरातही घडला असून मालदाड रोडवरील एका खासगी नोकरदाराला ‘लॉकडाऊन’मध्ये ऑनलाईन ‘फे्रंडशीप’ शोधणे तब्बल 3 लाख 30 हजार रुपयांना पडले आहे, अर्थात यातील एका कंपनीचा शोध लावून त्यांनी तक्रारदाराकडून लुटलेले 73 हजार रुपये परत आणण्यात सायबर पोलिसांना यश आले असले तरीही अन्य तीन कंपन्यांनी लुबाडलेल्या तब्बल 2 लाख 56 हजार 399 रुपयांसाठी त्यांना संगमनेर पोलिसांकडे धाव घ्यावी लागली आहे.

याबाबत मालदाड रोडवरील गणेश विहार वसाहतीत राहणार्‍या गणेश शंकर पवार या एकावन्नवर्षीय गृहस्थाने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार दोन वर्षांपूर्वी मार्च 2021 मध्ये कोविड संक्रमणाच्या कालावधीत देशात घरबंदी (लॉकडाऊन) लागू झाल्यानंतरच्या कालावधीत सदरचा प्रकार घडला. त्यावेळी उद्योग, धंदे बंद असल्याने दिवसरात्र घरातच असलेल्या गणेश पवार यांनी ऑनलाईन मित्र मिळविण्यासाठी गुगल सर्च इंजिनवरुन शोध घेण्यास सुरुवात केली. या दरम्यान अशाप्रकारच्या मित्र-मैत्रिणींचे असंख्य समूह इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे त्यांना दिसले. त्यातील काही वेबसाईटवर जावून त्यांनी खात्री केली असता तेथून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांचा विश्वास पक्का झाला. त्यानंतर त्यांनी आपली संपूर्ण माहिती त्या ‘लिंक’वर भरल्यानंतर त्यांना काही छायाचित्रे पाठविण्यात आली व त्यांनी दिलेल्या आपल्या स्वतःच्या मोबाईल क्रमांकावर त्यांना फोनही येवू लागले आणि वेगवेगळ्या लिंक्स पाठवून त्या शासकीय मान्यताप्राप्त असल्याचेही त्यांना भासवण्यात आले. सदरच्या फे्रंडशीप समूहाचे आजन्म सदस्य होण्यासाठी ठराविक रक्कम भरावी लागेल व पुढे सदरची योजना न पटल्यास आपण भरलेली संपूर्ण रक्कम परत करण्याचे आश्वासनही त्यांना देण्यात आले. त्यासाठी 1 मार्च 2021 पासून तक्रारदार पवार यांना मीड नाईट फे्ंरडशीप.कॉम या वेबसाईटच्यावतीने दत्ता मॅडम, आलिया मॅडम, ऋतिका मॅडम या नावाने विविध महिलांचे फोन व सोशल माध्यमातील संदेशही येवू लागले.

या तिघींनी एकामागून एक फोन करुन व संदेश पाठवून गणेश पवार यांचा विश्वास संपादन केला व आपल्या कंपनीकडून देण्यात येत असलेली स्किम कशी फायदेशीर आहे हे त्यांना पटवून देण्यात आले. त्यातून त्यांचा भरवसा पक्का झाला आणि डिजिटल क्रांतीने विणलेल्या गुन्हेगारीच्या जाळ्यात ते हळूहळू अडकत गेले. त्यातून 9 एप्रिल, 2021 रोजी त्यांनी आपल्या बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाच्या खात्यातून ऑनलाईन पद्धतीने एकूण 74 हजार रुपये ‘मीड नाईट फे्ंरडशीप.कॉम’ यांना त्यांनी दिलेल्या लिंकवरुन पाठविले. याच दरम्यान 3 एप्रिल रोजी सिक्रेट साथी.कॉम या वेबसाईटच्यावतीने खुशी शर्मा नामक महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानींही वरीलप्रमाणे योजनांची माहिती, शासकीय नोंदणी आदी माहिती देत त्यांचा विश्वास संपादन केला.

एका वेबसाईटच्या माध्यमातून पूर्वीच 74 हजारांना फसलेल्या या व्यक्तीला नंतर सिक्रेट साथीने वारंवार वेगवेगळ्या महिला व व्यक्तिंचा वापर करुन फोन केले व त्यांना आपल्या बनावट कंपनीचे सभासद होवून त्यात गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानुसार गणेश पवार यांनी वेगवेगळ्या तीन क्रमांकावर एकूण 1 लाख 60 हजार 99 रुपये भरले. या दोन्ही बनावट कंपन्या व वेबसाईटने त्यांना 2 लाख 34 हजार 99 रुपयांना लुटल्यानंतर तिसर्‍या बनावट वेबसाईटची एंन्ट्री झाली. यावेळी मिक्समॅच.कॉम असं नाव धारण केलेल्या या वेबसाईटने 29 एप्रिलपासून शुखी मॅडम व प्रियंका अग्रवाल या बनावट नावाने गणेश पवार यांना फोन करण्यास व संदेश पाठवण्यास सुरुवात केली.

या वेबसाईटनेही आधीच्याच दोन वेबसाईटचा कित्ता गिरवताना संबंधिताला वेगवेगळ्या योजना, त्यातून मिळणारे लाभ व न पटल्यास 100 टक्के रकमेचा परताव्याचे आमिष दाखवून त्यांना बाटलीत उतरवले. समोरुन येणार्‍या महिलांचे गोड बोलणे आणि त्यांनी दाखवलेल्या आमिषाचा मोह झाल्याने गणेश पवार यांनी त्याही वेबसाईटच्या लिंकवर जावून 22 हजार 300 रुपये पाठविले. अशा प्रकारे या तीनही वेबसाईटवर मिळून त्यांनी एकूण 2 लाख 34 हजार 99 रुपयांचा भरणा केला. यावेळी सदरची रक्कम त्यांना 17 जून, 2021 पर्यंत पुन्हा मिळेल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार जून संपला तरीही त्यांना कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पैसे भरण्यापूर्वी ज्या ज्या महिलांशी संपर्क केला होता त्यांना फोन करुन, संदेश पाठवून पैशांची मागणी सुरु केली.


त्याच दरम्यान खुशी शर्मा नावाने संवाद साधणार्‍या महिलेने ‘तुम्हाला तुमचे पैसे परत हवे असल्यास 26 हजार रुपये भरा, अन्यथा तुम्हाला पोलिसांत तक्रार द्याची असेल तर देवून टाका, तुमचे पैसे परत मिळणार नाही.’ असे बजावले. या दरम्यान या महाभागाने वेटडील.कॉम या साईटवरही 73 हजार रुपये भरले होते. मात्र त्याची मुदत संपल्यानंतरही ना त्यांना त्याचा परतावा मिळाला, ना त्यांना नंतर कोणी उत्तर देण्यास राहीले. त्यामुळे सुरुवातीला 22 जुलै, 2021 रोजी त्यांनी अहमदनगरच्या सायबर विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यांनी या प्रकरणाचा शोध घेतांना वेटडील.कॉमने त्यांच्याकडून लुबाडलेले 73 हजार रुपये पुन्हा मिळवून दिले. मात्र मीड नाईट फे्ंरडशीप.कॉमकडे जमा केलेले 78 हजार, सिक्रेट साथी.कॉमकडे भरलेले 1 लाख 60 हजार 99 व मिक्समॅच,कॉमवर भरलेले 22 हजार 300 रुपये मात्र त्यांना मिळवता आले नाही.

याप्रकरणी अखेर त्यांनी काल बुधवारी (15 जून) संगमनेर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना घडला प्रकार सांगितला. त्यानुसार त्यांनी दिलेल्या माहितीवरुन शहर पोलिसांनी दत्ता मॅडम, अलिया मॅडम, ऋतिका मॅडम, अलबिना राय, जेनी तमंग, खुशी शर्मा, कुणाल वर्मा, सोना गुप्ता, प्राची मॅडम, साक्षी अग्रवाल, अमर कामती, बीकी चौधरी, नीलव राय, काकुली, शुखी मॅडम, प्रियांका अग्रवाल व एक मोबाईल क्रमांक अशा एकूण 17 जणांवर भारतीय दंडसंहितेच्या कलम 420, 406 सह माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम 66 (ड) नुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख स्वतः करीत आहेत. संगमनेर शहरात अलिकडच्या काळात ऑनलाईन पद्धतीने लुटण्याचा हा सगळ्यात मोठा प्रकार ठरल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. अशा प्रकरणांमध्ये शहरातील आणखी काही व्यक्ती अडकलेल्या असण्याचीही शक्यता असून अशा व्यक्तिंनी शहर पोलिसांशी संपर्क साधध्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


मोबाईल व संगणक क्रांतीमुळे मानवाचे काम सोपे झाले असले तरीही त्याची दुसरी बाजू मात्र मानवी जीवनाला वेदना देणारी ठरु शकते याचे मोठे उदाहरण या प्रकारातून समोर आले आहे. देशातील, राज्यातील पोलीस व अन्य यंत्रणांकडून अशाप्रकारे फसवणुकीचे प्रकार घडू शकतात याबाबत वेळोवेळी जनजागृती केली जाते, मात्र तरीही सुशिक्षित समजले जाणारे अनेकजण झटपट फायदा मिळवण्याच्या नादात त्याकडे दुर्लक्ष करतात त्याचा परिणाम अशा स्वरुपात समोर येतो. संगमनेरसारख्या ग्रामीण शहरात घडलेला हा प्रकार गंभीर असून नागरीकांनी मोबाईल व संगणकाचा आर्थिक व्यवहारांसाठी वापर करतांना अधिक सावध व सतर्क राण्याची गरज यातून पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *