शेतकरी आंदोलनाला पाठिंबा; भेंडा ते कुकाणा ट्रॅक्टर रॅली कृषी कायदे रद्द करण्यासह इंधन दर कमी करण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, नेवासा
शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे या मागणीसाठी मंगळवारी (ता.26) दिल्लीत निघालेल्या शेतकर्यांच्या तिरंगा रॅलीला सक्रिय पाठिंबा म्हणून नेवासा तालुका अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने भेंडा ते कुकाणा अशी तिरंगा ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली.

किसान सभेचे नेते बाबा अरगडे, अॅड.बन्सी सातपुते, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अंकुश कानडे, शरद अरगडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या तिरंगा ट्रॅक्टर रॅलीचा प्रारंभ भेंडे येथील बसस्थानक परिसरातून झाला. तर कुकाणे येथे पोहोचल्यानंतर पोलीस मैदानावर सभा झाली. यावेळी अरगडे व सातपुते यांची भाषणे झाली.

दरम्यान, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, सध्या दिल्लीच्या सगळ्या सीमांवर दोन महिन्यांपासून शेतकरी ठिय्या आंदोलन करत आहेत. मात्र केंद्र सरकार शेतकर्यांच्या मागणीची दखल घेत नाहीत. आजपर्यंत या आंदोलनात 200 पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. त्यामुळे दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून अखिल भारतीय सभा शाखा नेवाशाच्यावतीने शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्यात यावे व डिझेलचे दर कमी झाले पाहिजेत असे म्हंटले आहे. या आंदोलनात ज्येष्ठ नेते आप्पासाहेब वाबळे, बाळासाहेब जावळे, बंडू अरगडे यांच्यासह एकूण 25 ट्रॅक्टर व शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. शेवटी भेंडा बसस्थानक परिसरात रॅलीची सांगता झाली.
