चलनातून जुन्या नोटा बाद होणार असल्याचे वृत्त साफ खोटे! मार्चअखेर शंभर, दहा व पाच रुपयांचा जुन्या नोटा बाद होणार असल्याची ‘अफवा’च

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही दिवसांपासून भारतीय रिझर्व्ह बँकेकडून चलनात असलेल्या जून्या शंभर, दहा व पाच रुपयांच्या नोटा बाद केल्या जाणार असल्याचे वृत्त मोठ्या प्रमाणात पसरले आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे चित्रही पहायला मिळत आहे. याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे वास्तव समोर आले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
![]()
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय मार्च किंवा एप्रिलपर्यंत 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा विचार करत असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. गेल्या आठवड्यात अनेक माध्यमांमध्येही तशाप्रकारचे वृत्त झळकले होते. समाज माध्यमांमध्येही या विषयीच्या अफवांना अक्षरशः पिकं आलं होतं. अखेर या अफवेची दखल घेत केंद्र सरकारच्या पत्रसूचना विभागाने (पीआयबी) याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. व्हायरल झालेल्या खोट्या बातम्यांबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी पीआयबीने पीआयबी फॅक्ट चेक या नावाने एक ट्विटर अकाऊंट सुरु केलं असून या अकाऊंटवरुन व्हायरल होणार्या बातम्यांची सत्यता पताळून त्यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं जातं.

आरबीआयकडून मार्च 2021 पासून शंभर, दहा आणि पाच रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात येणार आहेत, असा दावा एका वृत्तामध्ये केला जातोय, मात्र या वृत्तात कोणतेही तथ्य नाही असे पीआयबीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. याशिवाय, आरबीआयकडूनही अशा प्रकारची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही असेही पीआयबीने स्पष्ट केले आहे. पीआयबी फॅक्ट चेक केंद्र सरकारच्या पॉलिसी, योजना, विभाग व मंत्रालयांविषयी चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी कार्य करते. सरकारशी संबंधित कोणतीही बातमी सत्य आहे की असत्य हे जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेतली जाते. त्याद्वारे जुन्या नोटा चलनातून बाद केल्या जाणार असल्याचे वृत्त पूर्णतः निराधार आणि साफ खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमातून चलनातील शंभर, दहा व पाच रुपयांच्या जुन्या नोटा बाद होणार असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. प्रत्यक्षात यातील तथ्य जाणून घेतले असते भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही अथवा तसे नियोजनही नसल्याने केंद्र सरकारच्या ‘पीआयबी’ या संस्थेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, चलनात असलेल्या कोणत्याही मूल्याच्या नोटा बाद करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही हे अगदी सुस्पष्ट झाले आहे.
