अखेर सीताराम गायकरांसह ‘अगस्ति’च्या अकरा संचालकांचा राष्ट्रवादीत प्रवेश! उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती

नायक वृत्तसेवा, अकोले
जळगाव महापालिकेत शिवसेनेने जोरदार धक्का दिल्यानंतर आता अहमदनगरमध्ये सुद्धा भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. अहमदनगर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांच्यासह अगस्ति कारखान्याच्या अकरा संचालकांनी अखेर मंगळवारी (ता.16) उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

याप्रसंगी अहमदनगरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार बाळासाहेब पाटील, डॉ.किरण लहामटे, ज्येष्ठ नेते अशोक भांगरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, युवक जिल्हाध्यक्ष कपील पवार आदी उपस्थित होते. दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला मोठी गळती लागली होती. राष्ट्रवादीतील अनेक नेते हे भाजपमध्ये दाखल झाले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी मधुकर पिचड यांनीही आपल्या मुलासह भाजपमध्ये प्रवेश केला होता. मधुकर पिचड यांचा भाजप प्रवेश राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला होता. पण, आता अहमदनगरमध्ये पिचड यांच्या साम्राज्याचा खालसा करण्यास राष्ट्रवादीने पाऊल टाकले आहे.

अहमगदनगर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांच्यासह अगस्ति कारखान्याच्या अकरा संचालकांनी एकाचवेळी प्रेवश केला आहे. प्रकाश मालुंजकर, अशोक देशमुख, कचरू शेटे, रामनाथ वाकचौरे, बाळासाहेब ताजणे, गुलाब शेवाळे, भाऊसाहेब देशमुख, अमृतसागर दूध संघाचे भाऊपाटील नवले, शरद चौधरी, विठ्ठल चासकर, सुभाष बेनके, रवींद्र हांडे, सोपान मांडे, रेखा नवले, विठ्ठल डुंबरे यांचा समावेश आहे. गायकर यांची पुन्हा राष्ट्रवादीत घरवापसी झाल्यामुळे तालुक्यातील राजकारणाला कलाटणी मिळणार आहे. आगामी कारखाना, दूध संघ निवडणुकीत पिचड यांची कोंडी करण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल पडले आहे.

