अकोले शहरात ‘तक्षशिला’ अभ्यासिकेचा शुभारंभ
नायक वृत्तसेवा, अकोले
जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते सीताराम गायकर प्रतिष्ठान संचलित ‘तक्षशिला’ स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचा नुकताच शहरात मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असूनही, आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मोठ्या शहरात विद्यार्थी अभ्यास करु शकत नाहीत. तसेच जे विद्यार्थी पुणे-नाशिक यांसारख्या शहरात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते. त्यांनाही कोरोना संकटामुळे घरी परतावे लागले. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून विविध सामाजिक उपक्रमांवर अग्रेसर कार्य करणार्या सीताराम पा.गायकर प्रतिष्ठानने मोफत अभ्यासिका चालू करण्याचा निर्णय घेतला. या अभ्यासिकेचा कोरोना महामारीमुळे छोटेखानी कार्यक्रमात शुभारंभ करण्यात आला. यावेळी युवा उद्योजक नीलेश गायकर, अनिकेत चौधरी, सतेज गायकर, श्याम वाकचौरे, होलगीर सर, अनिकेत आवारी, श्रीकांत मालुंजकर, गणेश पापळ, सोमेश भिंगारे, विशाल देशमुख, गौरव वाघमारे, सचिन पापळ, वैभव मंडलिक, पराग चौधरी आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते.