तेलकुडगावातील मंदिराची दानपेटी फोडणार्यास अटक
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील तेलकुडगाव येथील चैतन्य नागनाथ मंदिरातील दानपेटी फोडून पसार झालेला आरोपी नुकताच कुकाणा दूरक्षेत्रातील पोलीस कर्मचार्यांनी जेरबंद केला आहे.
6 जानेवारीला चोरांनी तेलकुडगाव येथील चैतन्य नागनाथ मंदिरातील दानपेटी फोडून अंदाजे 17 हजार रूपयांची चोरी केली होती. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुरुवारी (ता.21) सांयकाळी खबर्यामार्फत या घटनेतील संशयित आरोपी पाचुंदा शिवारात असल्याची माहिती कुकाणा दूरक्षेत्रातील पोलीस कर्मचार्यांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कुकाणा दूरक्षेत्रातील पोलीस हवालदार बाळकृष्ण ठोंबरे, पोलीस नाईक राजेंद्र केदार, पोलीस शिपाई अंबादास गिते, नितीन भताणे, अमोल बुचकूल यांच्या पथकाने पाचुंदा शिवारात सापळा लावून संशयित आतिश लाजरस शिंदे (वय 23, रा.पाचुंदा, ता.नेवासा) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजेंद्र केदार हे करीत आहेत.