राहुरीचा कायापालट करण्यासाठी पाच कोटींचा निधी ः तनपुरे
नायक वृत्तसेवा, राहुरी
राहुरी शहराचा कायापालट करण्यासाठी अंतर्गत रस्ते व गटार योजनेसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सुधारित पाणी योजना, जॉगिंग ट्रॅकसह विविध कामे लवकरच पूर्ण केले जातील. पालिका निवडणूक काळात जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे, असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
पालिकेच्या विविध विकासकामांचा प्रारंभ मंत्री तनपुरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. नगराध्यक्षा अनिता पोपळघट, उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी, नगरसेवक दिलीप चौधरी, नंदकुमार तनपुरे, अनिल कासार, नितीन तनपुरे, अशोक आहेर आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना राज्यमंत्री तनपुरे म्हणाले की, पालिका निवडणुकीत जनतेने नगराध्यक्षपदी विजयी केले. परंतु, भाजप सरकारच्या काळात निधी मिळण्यात समस्या येत होत्या. आता महाविकास आघाडीचे सरकार असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्र्यांचे सहकार्य लाभत आहे. शहरातील कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लागत आहेत. सुधारित पाणी योजनेची 20 कोटींची निविदा नुकतीच प्रसिद्ध झाली. त्याचेही काम लवकरच सुरू होईल. जॉगिंग ट्रॅकसाठी दीड कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे.