साईबाबा मंदिराचे तीन व चार क्रमांकाचे प्रवेशद्वार खुले करा! खासदार सदाशिव लोखंडेंच्या नेतृत्वाखाली साईसंस्थानला ग्रामस्थांचे निवेदन

नायक वृत्तसेवा, शिर्डी
जगप्रसिद्ध तीर्थस्थान असणार्या साईबाबांच्या दर्शनासाठी रोज भाविकांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर तीन व चार क्रमांकाचे प्रवेशद्वार खुले करण्यासह इतर विषयांबाबत शुक्रवारी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांना निवेदन देण्यात आले आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की, कोविडचे संकट निवळत असून भाविकांची साईबाबांच्या दर्शनासाठी गर्दी होत आहे. त्यासाठी प्रवेशद्वार क्रमांक तीन व चार सुरू करावे, लहान मुले व वृद्धांना बसण्यासाठी व्यवस्था, अल्पोपहार, ग्रामस्थांची स्वतंत्र सुलभ दर्शन व्यवस्था, संस्थान कर्मचारी तिलक बागवे यांचे अन्यायकारक निलंबन मागे घ्यावे आदी विषयांची मागणी करुन चर्चा केली. दरम्यान, या बैठकीत अनेक विषयांवर मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे व ग्रामस्थांमध्ये मतभेद झाले. बगाटे यांनी प्रेवशद्वार खुले करण्यास नकार दर्शविला. तर ग्रामस्थांच्या दर्शन व्यवस्थेबाबत नियमावली तयार करून शासनासमोर मांडणार असल्याचे सागितले; याला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला.

मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे हे चुकीचा सल्ला देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यानंतर खासदार लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे व ग्रामस्थांनी प्रवेशद्वार क्रमांम तीन व दर्शन रांगेची पाहणी केली. त्यावर येत्या सोमवारपर्यंत निर्णय घेण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले. या बैठकीस उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, कैलास कोते, कमलाकर कोते, अभय शेळके, सुधाकर शिंदे, रमेश गोंदकर, नीलेश कोते, नितीन कोते, दिगंबर कोते, भानुदास गोंदकर, संदीप पारख, संजय शिंदे, राहुल गोंदकर, सचिन कोते, विजय जगताप, रवींद्र गोंदकर, धंनजय गाडेकर, नीलेश गंगवाल, संदीप लुटे, योगेश ओस्तवाल, मनोज लोढा आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
