ललितादेवी मालपाणी यांना जीवन गौरव पुरस्कार! माहेश्वरी समाजासाठी केलेल्या अभूतपूर्व कार्याचा समाजाकडून सन्मान

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महिला संघटनेच्यावतीने सहा दशकांच्या अविरत समाजसेवेबद्दल ललितादेवी मालपाणी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कोविड-19 च्या बंधनामुळे पुरस्कार प्रदान सोहळा ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्यावतीने त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. या पुरस्काराने गौरवान्वित होणार्या त्या माहेश्वरी समाजातील पहिल्या महिला ठरल्या आहेत.

मालपाणी उद्योग समूहाचे अध्वर्यू स्वर्गीय ओंकारनाथजी मालपाणी यांच्याशी सुमारे 62 वर्षांपूर्वी विवाहबद्ध झाल्यानंतर ललितादेवींनी पारिवारिक जबाबदारीसोबत समाजहिताच्या उपक्रमांनाही तितकेच प्राधान्य दिले. श्रीमद्भगवद्गीतेत सांगितलेले ज्ञानामृत कृतिशीलतेच्या माध्यमातून त्यांनी समाजाच्या उपयोगात आणले. मालपाणी उद्योग समूहाचा विस्तार होत असताना सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, धार्मिक, आरोग्य विषयक, महिला सक्षमीकरण, गरजवंतांना सहाय्य अशा विविध प्रकारच्या जबाबदार्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या.

सेवा कार्याच्या माध्यमातून त्यांनी अनेकांच्या जीवनाला सुंदर, संपन्न आणि समृद्ध बनण्यासाठी अविरत प्रयत्न केले. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची कुशलता यामुळे त्यांना महिलावर्गाची भक्कम साथ मिळत गेली. सर्वांना शिक्षणाची सुविधा सहज उपलब्ध व्हावी या उद्देशाने त्यांनी शारदा शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेचे मालपाणी विद्यालय शिक्षण क्षेत्रातील अग्रेसर विद्यालय म्हणून नावारूपास आले आहे. माहेश्वरी समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांनी दिलेले योगदान अभूतपूर्व आहे. समाजामध्ये अध्यात्मिकता, धार्मिकता आणि संस्कार रुजविण्यासाठी त्यांनी महिला मंडळातील महिलांच्या सहकार्याने अनेक पुस्तकांचे संकलन केले. त्यापैकी काही पुस्तकांच्या अनेक आवृत्या प्रकाशित कराव्या लागल्या. या पुस्तकांच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपर्यात सद्विचारांचे सिंचन करणे शक्य झाले.

त्यांच्या पुढाकारामुळे देशातील अनेक साधू, संत, महंत, कथाकार, प्रवचनकार, निरुपणकार यांच्या कार्यक्रमांचेही संगमनेरात आयोजन झाले. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने 33 वर्षांपूर्वी गीता परिवाराची स्थापना करण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा होता. गीता परिवाराच्या कार्याचा विस्तार आज 18 राज्यांमध्ये झाला आहे. माहेश्वरी समाजामध्ये त्यांनी विधवा पुनर्विवाह अभियान यशस्वीरीत्या राबवून नवक्रांती घडवून आणली. समाजहिताच्या ध्यासाने झपाटलेल्या ललितादेवींना त्यांच्या कार्याबद्दल संत सेवा पुरस्कार, आदर्श माता पुरस्कार, माहेश्वरी समाज भूषण पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी आजवर सन्मानित करण्यात आले आहे.

