ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांचा समन्वय साधून उत्तम आयुष्य जगता येते ः डॉ.उपाध्ये

ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांचा समन्वय साधून उत्तम आयुष्य जगता येते ः डॉ.उपाध्ये
संगमनेर फेस्टिव्हलच्या चौथ्या दिवशी डॉ.संजय उपाध्ये यांच्या ‘जिंकलो ऐसे म्हणा’ कार्यक्रमाचे आयोजन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
काही माणसं जगत असताना चेहर्‍यावर सतत हरलेले भाव घेवून जगतात. जे घडून गेलं आहे, त्याबद्दल मनात तृप्ती नसली की माणूस आजारी पडतो. म्हणून ‘नका आठवु पुन्हा पुन्हा त्या, गतकाळातील खुणा, आजवरी जे जगलो ते मी, जिंकलो ऐसे म्हणा’ असे सांगत आनंदी जगण्याचे शास्त्र सांगणारा अनोखा कार्यक्रम बुधवारी संगमनेर फेस्टिव्हलच्या डिजिटल रंगमंचावर सादर झाला. पुण्याच्या डॉ.संजय उपाध्ये यांनी सादर केलेला हा कार्यक्रम ‘ऑनलाईन’ रसिकांना भलताच भावला.


यावेळी उपाध्ये पुढे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांनी पिंपळपानासारखे जगायला शिकले पाहिजे. कारण जाळी झाली तरी आयुष्याच्या पुस्तकात आपले अस्तित्व इतरांनी पिंपळ पानासारखे जपून ठेवले पाहिजे. जन्मासह मृत्यू असतोच. आपल्या हातात फक्त जगणे असते. त्यामुळे हसतखेळत, सहज जगता आले पाहिजे. शारीरिक व्याधी कोणालाही चुकल्या नाहीत; पण दृष्टिकोन बदलला तर व्याधी देखील सुसह्य होतात असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी दिला.


ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांचा समन्वय साधून उत्तम आयुष्य जगता येते. भुतकाळात जे घडलं ते उगळीत बसल्यास आजचा दिवसही निराशामय होतो. त्यासाठी त्यांनी ‘झाले गेले होऊन गेले, पुढचे निश्चित ठाऊक नाही, वर्तमान हा क्षणाक्षणाचा ज्येातिष पुढचे घाऊक नाही, अपुल्याहूनही दुःखिंत ऐशा बघा भोवती जना, आजवरी जे जगलो ते मी जिंकलो ऐसे म्हणा’ या त्यांच्याच कवितेचा आधार घेत कालचे विसरुन आज जगायला शिकण्याचा सल्ला त्यांनी दिला.


कोविडच्या संकटातही पर्याय शोधून इतक्या उत्साहाने हा उत्सव सातत्य न मोडता सुरु ठेवणे म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेची बाब आहे. ही मनोवृत्ती केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हेतर, संपूर्ण देशासाठी खजाणा ठरणारी असल्याचेही डॉ.उपाध्ये यांनी आपल्या निरुपणादरम्यान सांगितले. फेस्टिव्हलचे अध्यक्ष मनीष मालपाणी, सचिव महेश झंवर व कोषाध्यक्ष कल्याण कासट यावेळी उपस्थित होते. राजस्थान युवक मंडळाचे उपाध्यक्ष रोहित मणियार यांनी डॉ.उपाध्ये यांचा परिचय करुन दिला. गिरीश मालपाणी यांनी आभार व्यक्त केले. डिजिटल माध्यमातून सादर झालेल्या या कार्यक्रमाला ऑनलाईन प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

Visits: 124 Today: 2 Total: 1577960

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *