यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचा ज्ञानेश्वरी ग्रंथ हस्तलेखन उपक्रम मंत्री गडाखांच्या हस्ते भाविकांना वह्या वाटप करून उपक्रमाचा शुभारंभ

नायक वृत्तसेवा, नेवासा
नेवासा येथील श्री संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थान व यशवंत सामाजिक प्रतिष्ठान सोनई यांच्या संयुक्त संकल्पनेतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 725 व्या सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सवी संजीवन समाधी सोहळा पूर्तीच्या निमित्ताने ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी हस्तलेखन उपक्रम चैत्र शुद्ध प्रतिपदेला अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी भाविकांना सहाशे पानी वह्या विनामूल्य देऊन शुभारंभ करण्यात आला.

मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते भाविकांना वह्यांचे वाटप करुन उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, विश्वस्त विश्वास गडाख, कैलास जाधव, कृष्णा पिसोटे, रामभाऊ जगताप, ज्ञानेश्वर शिंदे, कैलास जाधव, पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे, सतीश पिंपळे, अण्णासाहेब पेचे, नंदकुमार पाटील, लक्ष्मण जगताप, काशीनाथ नवले, विक्रम चौधरी, महेश मापारी, भैय्या कावरे, जालिंदर गवळी, डॉ.गजानन दरंदले, आप्पासाहेब निमसे यांसह महाराज मंडळी व भाविक उपस्थित होते.

हस्तलिखित ज्ञानेश्वरी ग्रंथ एक वर्षभरात लिहून पूर्ण करावयाचा असून लिखानासाठी वै. हभप. मामासाहेब दांडेकरांनी प्रकाशित केलेली ज्ञानेश्वरी पारायण प्रत वापरावी लागणार आहे. या वर्षभराच्या उपक्रमात सहभागी झालेल्या भाविकांनी रोज किमान 30 ओव्या (वहीचे एक पाठपोट पान) लिहून पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. या उपक्रमाविषयी माहिती देताना ज्ञानेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त शिवाजी महाराज देशमुख म्हणाले, संत ज्ञानेश्वर महाराजांनी गुरू निवृत्तीनाथांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या विश्वाला तारक ठरणार्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे लिखाणासाठी नेवासा नगरीची निवड केली ही आपल्या नेवासाकरांसाठी अनमोल भेट आहे. त्यामुळेच ज्या खांबाला टेकून संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली त्या पवित्र खांबाचे व त्यांच्या पदस्पर्शाने पुणीत झालेल्या भूमीचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून हजारो भाविक याठिकाणी मोठ्या श्रद्धेने येत असतात. म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सवी संजीवन समाधी सोहळ्याच्या पूर्तीनिमित्त राज्यभर विविध नाविन्यपूर्ण उपक्रम साजरे होत असताना ज्याठिकाणी त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती केली त्या तालुक्यातील जाणत्या भाविकांकडून किमान 725 ज्ञानेश्वरी ग्रंथ हस्तलेखनातून लिहिले जावेत अशी संकल्पना समोर आली. या हस्तलेखन उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणार्या भाविकांसाठी एक आदर्श नियमावली तयार केली असून तिचे काटेकोरपणे पालन सर्व सहभागी भाविकांनी करून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही देशमुख महाराज यांनी केले आहे.
