कोतूळमध्ये अवैध दारूविक्री अड्ड्यांवर पोलिसांचा छापा
कोतूळमध्ये अवैध दारूविक्री अड्ड्यांवर पोलिसांचा छापा
नायक वृत्तसेवा, कोतूळ
अकोले तालुक्यातील कोतूळ येथील अवैध दारूविक्रीच्या दोन अड्ड्यांवर पोलिसांनी बुधवारी (ता.26) रात्री दहा वाजेच्या सुमारास छापा टाकत 2 हजार 652 रुपयांच्या देशी दारुच्या 51 बाटल्या जप्त केल्या आहेत.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, कोतूळ येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरमध्ये अवैध दारूविक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर छापा टाकला असता कमल विजय खरात ही घराच्या आडोशाला दारूविक्री करताना आढळून आली. पोलिसांनी 1664 रुपयांच्या देशी दारूच्या 32 बाटल्या हस्तगत केल्या. या प्रकरणी पोलीस शिपाई विजय खुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कमल खरात हिच्या विरोधात गुरनं.549/2020 नुसार मुंबई प्रो.अॅक्ट कलम 65 ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरा छापा येथीलच वडारवाडीमध्ये मारला असता रामनाथ नाना पवार हा दारूविक्री करताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून 988 रुपयांच्या देशी दारूच्या 19 बाटल्या हस्तगत केल्या. या प्रकरणी पोलीस शिपाई प्रदीप बढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं.550/2020 नुसार मुंबई प्रो.अॅक्ट कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुक्रमे पोहेकॉ.पालवे आणि पोलीस नाईक गोंधे हे करत आहेत.