राहुरीच्या पाणी पुरवठा योजनेची 19 कोटी 75 लाखांची निविदा प्रसिद्ध लवकरच ठेकेदाराची नियुक्ती होऊन योजनेच्या कामास सुरुवात होणार ः तनपुरे
नायक वृत्तसेवा, राहुरी
शहराच्या सुधारित पाणी पुरवठा योजनेचे मुळा धरण येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र, गुरुत्ववाहिनी, दोन जलकुंभांची बांधकामे व अंतर्गत वितरणाच्या जलवाहिनींच्या कामांसाठी 19 कोटी 75 लाखांची निविदा प्रसिद्ध झाली. लवकरच ठेकेदाराची नियुक्ती होऊन सुधारित पाणी योजनेच्या कामास सुरुवात होईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
याबाबत राज्यमंत्री तनपुरे म्हणाले, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या शासन निर्णयातून खास बाब म्हणून राहुरी पाणी योजनेच्या कामाला सूट दिल्यामुळे निविदा प्रक्रिया सुरू झाली. राहुरी पालिकेच्या निवडणुकीत जाहीरनाम्यातील आश्वासनपूर्तीची वाटचाल करताना समाधान वाटते. सन 2050 ची लोकसंख्या गृहीत धरून सुधारित पाणी योजनेचा आराखडा केला आहे. राहुरी शहर व सर्व वाड्या-वस्त्यांवर योजनेद्वारे पाणी मिळेल. पालिकेची सुधारित पाणीयोजना 25 कोटी 93 लाख रुपयांची आहे. मुळा धरणातून अशुद्ध पाण्याचा उपसा करून, ते जलशुद्धीकरण केंद्रात पोचविणारी मशीनरी व सौरऊर्जा प्रकल्प आदी कामांची स्वतंत्र निविदा प्रक्रिया होणार आहे.
मुळा धरणातील जॅकवेलपर्यंतच्या चराचे काम, धरणाजवळ नवीन तीन लाख 50 हजार लीटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्राचे बांधकाम, जलशुद्धीकरण केंद्रापासून राहुरी शहरापर्यंत 9.71 किलोमीटर लांबीचे नवीन स्वतंत्र गुरुत्ववाहिनीचे काम, जुन्या गुरुत्ववाहिनीचे तीन किलोमीटरचे लांबीचे दुरुस्तीचे काम, राहुरी येथे मुख्याधिकारी निवासस्थानाजवळील 30 वर्षांचे विहित आयुर्मान संपलेले जुने जलकुंभ निष्कासित करून त्याजागी नऊ लाख लिटर क्षमतेच्या नवीन जलकुंभाचे बांधकाम, येवले आखाडा येथे एक लाख 62 हजार लिटर क्षमतेच्या नवीन जलकुंभाचे बांधकाम, राहुरी शहर व वाड्या-वस्त्यांवर 77.2 किलोमीटर लांबीची अंतर्गत वितरणाची नवीन जलवाहिनी पसरविणे आदी कामे मार्गी लागणार आहेत.