आमटी-भाकरी भंडार्याचा उपक्रम लवकर सुरू करा! भाविकांसह नागरिकांची बहिरवाडी देवस्थानकडे मागणी
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील श्री क्षेत्र बहिरवाडी येथे दर रविवारी सुरू असलेला आमटी-भाकरी भंडार्याचा उपक्रम सुरू करावा अशी मागणी भाविकांनी प्रसारमाध्यमांकडे बोलून दाखवली आहे.
कोरोना महामारीमुळे येथे वर्षभर होणारे धार्मिक सोहळे व उपक्रम हे साध्या पद्धतीने पार पडले होते. पौष महिन्यात दर रविवारी भरणार्या यात्रा मात्र रद्द करण्यात आल्या होत्या. नववर्षाच्या शुभारंभीच कोरोना रुग्णालये बंद होताना दिसली व दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव हळहळू कमी होताना दिसत असून लसही बहुतांश शहरात येऊन पोहोचल्याने कोरोनाची भीती ही हळूहळू कमी होत असताना दिसत आहे. तरी देखील शासकीय नियमांचे पालन करून बहिरवाडी येथे कोरोनाच्या काळात बंद पडलेला आमटी-भाकरीचा महाप्रसाद उपक्रम सुरू करावा अशी मागणी भाविक करताना दिसत आहे.
श्री कालभैरवनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेली बहिरवाडी हे पवित्र क्षेत्र आहे. श्री क्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली या तीर्थक्षेत्राचा विकास झाला आहे. महाराजांनी केलेल्या आवाहनाला साद घालत भाविकांनी दिलेल्या आर्थिक योगदानामुळे सुमारे सव्वा कोटी रुपये खर्चाचे भव्य मंदिर येथे प्रवरा नदीच्या मध्यावर उभारण्यात आलेले आहे. नदी पात्रात असलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे या क्षेत्राच्या वैभवात आणखीच भर पडलेली दिसत आहे.
दरम्यान, भास्करगिरी महाराजांच्या प्रेरणेने व श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या कृपा आशीर्वादामुळे येथे यापूर्वी होत असलेली बोकड-कोंबड्याची बळी देण्याची प्रथा बंद करण्यात आली आहे. महाराजांच्या सूचनेनुसार आमटी-भाकरीच्या मोफत उपक्रमाला प्राधान्य देण्यात आलेले आहे. या उपक्रमाला भाविकांसह अन्नदात्यांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. दर रविवारी येथे भाविक दर्शनासाठी येतात. दर्शनासाठी येणार्या भाविकांची गर्दी कमी प्रमाणात असल्याने कोरोनाच्या काळात बंद पडलेला आमटी-भाकरी प्रसाद वाटपाचा मोफत उपक्रम दर रविवारी सुरू करावा अशी मागणी भाविकांनी केली आहे. देवस्थानने देखील या मागणीकडे लक्ष घालावे अशा भावना भाविकांसह नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.