आमदार सत्यजीत तांबेंकडून देवेंद्र फडणवीसांचे कौतुक! संगमनेरच्या राजकारणात पुन्हा ‘ट्विस्ट’; समर्थकांच्या स्टेट्सवरही ‘देवाभाऊ’..
श्याम तिवारी, संगमनेर
‘एबी’ फॉर्मचा विषय पुढे करुन ऐनवेळी स्वपक्षालाच बायपास करीत पदवीधर मतदारसंघात अपक्ष लढलेल्या आमदार सत्यजीत तांबे यांची राजकीय भूमिका नेहमीच ‘गुढ’ राहीली आहे. त्यात भर घालणारा आणखी एक प्रकार आता समोर आला असून देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी सोशल माध्यमातील सर्व प्लेटफॉर्मवर त्यांच्या अभिनंदनाच्या पोस्ट करुन त्यांच्याशी असलेल्या संबंधावर थेट झोत टाकला आहे. विशेष म्हणजे यावेळी आमदार तांबेंसह त्यांच्या स्थानिक समर्थकांच्या स्टेट्सवरही ‘देवाभाऊ’ झळकल्याने संगमनेरच्या राजकारणात नवा ‘ट्विस्ट’ निर्माण होण्यासह अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत. अर्थात फडणवीसांशी असलेला त्यांचा ‘स्नेहबंध’ यापूर्वीही वेळोवेळी ठळकपणे समोर आला होता. मात्र यावेळी त्यांचे मामा आणि राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाल्यानंतरही त्यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांच्या कौतुकाचा कशिदा विनला गेल्याने नाशिक पदवीधर मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याचे गव्हर्नर गॅविन न्यूसन यांनी लिहिलेल्या सिटीझनविल या पुस्तकाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी मराठीत भाषांतर केले होते. त्याचे प्रकाशन तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. त्यावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरातही उपस्थित होते. प्रकाशनानंतर बोलताना फडणवीस यांनी थोरातांना उद्देशून ‘तुमच्याकडे जी चांगली लोकं आहेत त्यांना संधी द्या, नाहीतर त्यांच्यावर आमची नजर आहे’ असे सूचक वक्तव्य करीत राज्यात खळबळ उडवून दिली होती. त्यांचे हे बोलणे एकप्रकारे सत्यजीत तांबे यांना ‘राजकीय ऑफर’ देणारे असल्याचा निष्कर्षही त्यावेळी विश्लेषकांनी काढला होता. त्याची चुणूक नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून दिसूनही आली होती.
त्यावेळी या मतदारसंघातून सलग निवडून आलेल्या डॉ.सुधीर तांबे यांना काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही त्यांनी अगदी शेवटच्या क्षणी आपली उमेदवारी टाळून सत्यजीत तांबे यांचा अपक्ष अर्ज दाखल केला. त्यांच्या या भूमिकेनंतर राज्यातील काँग्रेसमध्ये खळबळ उडून दोघांनाही पक्षातून निलंबितही करण्यात आले होते. मात्र त्याचा सत्यजीत तांबे यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. उलट भाजपच्या मदतीने सहज निवडून आलेल्या तांबेंनी आमदार होताच महायुती सरकारवर थेट टीका टाळण्यासह वारंवार देवेंद्र फडणवीसांच्या भेटी घेवून त्यांच्याशी जवळीक वाढवली. त्या बदल्यात अपक्ष असतानाही सभागृहात त्यांना वेगवेगळ्या विषयावर बोलण्याची संधी आणि मिळणारा निधी वाढत गेल्याने भविष्यात ते भाजपमध्ये दिसले तर आश्चर्य वाटणार नाही अशीही स्थिती निर्माण झाली. त्यातून त्यांनी आपले राजकीय ‘गुढ’ वाढवत नेल्याने आजही राज्यात त्यांच्याकडे राजकीय संशयाने बघितले जाते.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी त्यांचे मामा बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघा शिवाय अन्य कोठेही लक्ष घातले नाही आणि प्रचारादरम्यान काँग्रेस अथवा महाविकास आघाडीबाबत चकारही उच्चारला नाही. त्यामुळे त्यांच्या विषयी असलेला राजकीय संशय अधिक वाढला असतानाच आज (ता.5) सकाळीच सोशल माध्यमातील वेगवेगळ्या प्लेटफॉर्ममधून त्याचा प्रत्ययही आला आहे. राज्यात ऐतिहासिक बहुमत मिळवून सत्तेवर आलेल्या महायुती सरकारच्या शीर्षस्थानी भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांची निवड होताच आमदार सत्यजीत तांबे यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या राजकीय कारकीर्दीचा आढावा घेत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
फेसबुकसह एक्स या सोशल माध्यमावर लिहिलेल्या भल्यामोठ्या पोस्टमध्ये आमदार सत्यजीत तांबे यांनी ‘मा. देवेंद्र फडणवीस यांची 2014 साली पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देताना मी अनेक अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. 2014 ते 2024 या दशकात विविध भूमिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी त्यांनी घेतलेले निर्णय पाहता माझ्या शुभेच्छा योग्य ठरल्या याचा आनंद आहे’ असे सांगत 2014 ते 2019 या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कार्यकाळात महायुती सरकारने समृद्धी महामार्ग, अटल सेतू, कोस्टल रोड, जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटर ग्रीड, सारथी, बार्टी, टार्टी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासारख्या संस्था, एक रुपयांत पिकविमा, मागेल त्याला सौरपंप, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती यासारखे निर्णय घेतल्याचा उल्लेख केला आहे.
त्यांच्या याच पोस्टमध्ये पुढे 2019 ते 2022 या काळात फडणवीस यांनी विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत असताना जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका पार पाडल्याचे सांगत वीज बिलाच्या प्रश्नावरील आक्रमक धोरण, कोविड काळात राज्याचा दौरा, आरोग्य खात्यातील गैरकामाला विरोध, शिक्षण, आरोग्य, उद्योग अशा विविध क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न, जनहिताच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरण्याची भूमिका यासह 2022 ते 2024 या कालावधीत फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील शेतकर्यांसाठी मोफत वीज, लाडकी बहिण योजना, महिलांना बस प्रवासात 50 टक्के सूट, लेक लाडकी योजना, नमो शेतकरी सन्मान योजना, गरीब कुटुंबांना प्रत्येकी तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी अन्नपूर्णा योजनेचा उल्लेख करीत देवेंद्र फडणवीस उत्तम वक्ते, मोठ्या मनाचा, दूरदृष्टी असलेला आणि सहज उपलब्ध होणारा नेता अशा शब्दात त्यांची स्तुती करीत त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या भावी पिढ्यांच्या कल्याणाची कामे होतील अशी अपेक्षाही आमदार तांबे यांनी व्यक्त केली आहे. त्याशिवाय संगमनेरातील त्यांच्या समर्थकांच्या स्टेट्सवरही आज सकाळपासूनच ‘देवाभाऊ’ झळकल्याने नाशिक पदवीधर मतदारसंघातील राजकीय चर्चांना बळ मिळाले आहे.
दोनच दिवसांपूर्वी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ‘स्नेहसंवाद मेळावा’ आयोजिला होता. त्यावेळी मंचावर थोरात यांच्यासह माजी आमदार डॉ.सुधीर तांबे आणि आमदार सत्यजीत तांबे यांची उपस्थिती होती. यावेळी आपल्या प्रास्तविक भाषणात डॉ.तांबे यांनी गेल्या अडीच वर्षांच्या महायुती सरकारच्या कारभारावर आसूड ओढताना त्यांच्या धोरणांवरही सडकून टीका केली. तर, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यापुढील काळात पुन्हा उभारी घेवून संघर्ष करण्याचा मनोदय व्यक्त करतानाच प्रसंगी सरकारशी बोलावे लागले तरी आमदार सत्यजीत तांबे यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलू असे सांगितले होते. त्यावेळी थोरात यांच्या ‘त्या’ वक्तव्याचेही वेगवेगळे अर्थ काढले गेले होते. त्याला अवघे दोनच दिवस उलटले असतानाच थोरातांचा स्नेहसंवाद मंच भूषविणार्या आमदार तांबे यांनी राज्याचे नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळल्याने राज्यातील राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना सत्यजीत तांबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फलकाला काळे फासून आक्रमक आंदोलन केले होते. मात्र त्यानंतर नाशिक पदवीधर मतदारसंघात त्यांनी पक्षाकडून वडिलांऐवजी आपल्यासाठी उमेदवारी मागितल्याने राज्यात खळबळ उडाली होती. पक्षाने शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना ताटकळत ठेवताना ऐनवेळी दोन ‘एबी’ फॉर्म पाठवले, मात्र तोपर्यंत तांबे यांनी भाजपशी संधान साधून आपल्या अपक्ष उमेदवारीचा मार्ग प्रशस्त केला होता. तेव्हापासूनच त्यांची फडणवीसांशी जवळीक वाढली आहे. आतातर त्यांचे मामा विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने येणार्या काळात त्यांनी थेट भाजपचा तंबू गाठल्यास आश्चर्य होणार नाही.