गणेगावमध्ये डीजेच्या दणदणाटात मिरवणूक काढणार्‍यांना पोलिसांनी चोपले अंगावर गुलाल दिसेल त्याला बदडले; 50 जणांवर गुन्हा, 20 जणांना अटक

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील गणेगाव ग्रामपंचायत निवडणुकीचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी जेसीबीवरून गुलाल उधळत, डीजेच्या दणदणाटात मिरवणूक काढणार्‍यांना पोलिसांनी अडविले; पण कोणीच ऐकत नव्हते. अखेर दंगल नियंत्रण पथकाने थेट जमावावर हल्लाबोल केला. काठ्यांचा प्रहार होताच कार्यकर्त्यांना पळता भुई थोडी झाली. पथकाने घराघरांत घुसून, अंगावर गुलाल दिसेल त्याला बदडले. याप्रकरणी 50 जणांवर गुन्हे दाखल करुन 20 जणांना अटक करण्यात आली आहे.

गणेगाव येथे भाजपने राष्ट्रवादीचा पराभव करीत सर्व नऊ जागांवर दणदणीत विजय मिळविला. हा विजय साजरा करण्यासाठी सोमवारी (ता.18) सायंकाळी उमेदवारांची जेसीबीवरून मिरवणूक निघाली. डीजेचा आवाज घुमला. जेसीबीवरून गुलालाची उधळण सुरू झाली. याबाबत पोलिसांना माहिती समजताच, तीन पोलिसांनी मिरवणूक बंद करण्याची विनंती केली; परंतु त्यांचे कोणीही मनावर घेतले नाही.

याबाबत पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना कळविले. त्यांनी ही बाब पोलीस अधीक्षकांच्या कानावर घातली. आणि त्यानंतर सूत्रे हलली. दंगल नियंत्रक पथकाचे एक उपनिरीक्षक व 27 जणांचे पथक चार वाहनांतून गावात दाखल झाले. त्याने थेट मिरवणुकीवर हल्लाबोल केला. भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल भानगडे यांच्यासह 20 जणांना राहुरी पोलीस ठाण्यात आणले. रात्री उशिरा 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Visits: 97 Today: 3 Total: 1102483

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *