… तर पुढील महिन्यात साई मंदीर खुले करू ः खा.डॉ.विखे
… तर पुढील महिन्यात साई मंदीर खुले करू ः खा.डॉ.विखे
संस्थान कामगार संघटनांच्या पदाधिकार्यांतर्फे खासदार विखेंना निवेदन
नायक वृत्तसेवा, शिर्डी
येत्या महिनाभरात राज्य सरकारने मंदिरांबाबत निर्णय घेतला नाही, तर पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अर्थकारणाला चालना देण्यासाठी शिर्डीतील साई मंदीर खुले करू, असा खणखणीत इशारा खासदार डॉ.सुजय विखे यांनी दिला आहे.
राज्य सरकारने कंगनासोबत भांडण्याऐवजी साई मंदीर खुले करून येथील रोजीरोटी सुरू करावी, अशी टीपण्णीही त्यांनी केली. साई संस्थानच्या 598 कंत्राटी कामगारांना पूर्वीप्रमाणे संस्थान आस्थापनेवर घ्यावे. कोविड सेवेत असलेल्या कंत्राटी कर्मचार्यांची वेतनकपात मागे घ्यावी. केंद्र सरकारप्रमाणे संस्थान कर्मचार्यांच्या ग्रॅच्युईटीबाबत निर्णय करावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन शुक्रवारी (ता.11) संस्थान कामगार संघटनांच्या पदाधिकार्यांतर्फे खासदार डॉ.विखे यांना देण्यात आले. कामगार संघटनेचे नेते राजेंद्र जगताप, तुषार शेळके, राजेंद्र कोते, प्रताप कोते, विलास गोंदकर, यादवराव कोते आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना खासदार डॉ.विखे म्हणाले, कोविड सेवेत असलेल्या कंत्राटी कामगारांना अधिक मोबदला देण्याऐवजी त्यांची वेतनकपात केली. समितीचे सदस्य स्वतःचा पगार कमी करणार आहेत का? साई संस्थानचे काम पाहणारी समिती अधिकारांचे उल्लंघन करते. सरकारने यापूर्वी घेतलेले निर्णय फिरविण्याचा अधिकार समितीला नाही. कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना गेल्या तीन महिन्यांपासून वेळ देत नाही. आठ दिवसांत वेळ दिला नाही, तर समिती सदस्यांच्या कामकाजाच्या ठिकाणी जाऊन आंदोलन करू. येत्या महिनाभरात राज्य सरकारने निर्णय घेतला नाही, तर पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अर्थकारणाला चालना देण्यासाठी साई मंदिर खुले करू, असा खणखणीत इशारा त्यांनी दिला.
ग्रामस्थांच्या प्रतिनिधींनी घंटानाद करून आंदोलनास पाठिंबा दिला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष कैलास कोते, साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजय कोते, नितीन कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, रवींद्र गोंदकर, गोपीनाथ गोंदकर, ज्ञानेश्वर गोंदकर, सचिन तांबे, साईराज कोते, नगरसेवक दत्तात्रय कोते आदी उपस्थित होते.