सोनई ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच मुस्लीम समाजाला प्रतिनिधीत्व! विजयानंतर छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन केला आनंदोत्सव
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील सोनई ग्रामपंचायतीच्या साठ वर्षांच्या इतिहासात प्रथमच मुस्लीम समाजास प्रतिनिधीत्व मिळाले. या आनंदात युवा मुस्लीम बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून आनंद व्यक्त केला आहे. सध्या या प्रकाराची जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.
सोनई ग्रामपंचायतीची स्थापना सन 1960 ला झाली आहे. तेव्हापासून सदस्य मंडळात मुस्लीम समाजास प्रतिनिधीत्व मिळाले नव्हते. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी या निवडणुकीत इम्तेसाम जमशेद सय्यद (वय 20) या युवतीस प्रभाग क्रमांक चारमधून संधी दिली. त्यानंतर प्रभागातील सर्वधर्मीय कार्यकर्त्यांनी कष्ट घेत सय्यद यांचा विजय सुकर केला. विजयानंतर इम्तेसामचे सय्यद यांचे वडील जमशेद सय्यद यांनी सर्वप्रथम शिवाजी चौकात येवून छत्रपती पुतळ्यास पुष्पहार घालून आशीर्वाद घेतला. यावेळी फारुक पठाण, इसाक शेख, नजीर शेख, फिरोज पठाणसह अधिक युवक उपस्थित होते. मंत्री गडाख सर्व समाजाला बरोबर घेवून जात असून त्यांचे कार्य भूषणावह आहे, असे सय्यद यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते नवनिर्वाचित सय्यद यांच्या पुढाकारातून रमजान ईद, शिवजयंती, गणेशोत्सव हे उत्सव गुणगोविंदाने साजरे केले जातात. सोनईत मुस्लीम समाजाची सुमारे एक हजार मते आहेत. मात्र, वेगवेगळ्या प्रभागात विखुरली आहेत. या समाजाला ग्रामपंचायतमध्ये आत्तापर्यंत संधी नव्हती. त्यामुळे मंत्री गडाख यांनी जाणीवपूर्वक शिवसेनेच्या मंडळाकडून सय्यद यांना संधी दिली.
सय्यद यांना 200 मतांचे लिड…
सय्यद यांच्या विरोधात प्रकाश शेटे मंडळाचे श्यामला येळवंडे रिंगणात होत्या. इतर प्रभागातील काही लोकांनी हिंदू-मुस्लिम असा धार्मिक वाद निर्माणाचा प्रयत्न केला. मात्र, त्या प्रभागातील मतदारांनी तो विषय झुगारून सय्यद यांना विजयी केले. विशेष म्हणजे तेथे हिंदू मतदार जास्त आहेत. सुमारे दोनशे मतांच्या फरकाने त्या विजयी झाल्या. या गावात विशेष म्हणजे मुस्लीम समाजाची प्रार्थना स्थळे शिवाजी चौकात आहेत.