कोदणी वीज प्रकल्पात बिबट्याच्या मादीची प्रसूती
कोदणी वीज प्रकल्पात बिबट्याच्या मादीची प्रसूती
मादी निघून जाण्याची वीज कर्मचार्यांसह वन विभागाला प्रतीक्षा
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील कोदणी वीज प्रकल्पात एका बिबट्याच्या मादीची प्रसूती झाली असून तिने चार पिल्लांना जन्म दिला आहे. यामुळे एकीकडे स्वत:च्या जीवाची भीती तर दुसरीकडे तिच्या पिलांची चिंता अशा परिस्थितीत गेले पंधरा दिवस वीज प्रकल्पातील कर्मचार्यांचे काम सुरू आहे. या प्रकल्पात पिंजरा लावून तिला पकडायचे झाले तर तिची व पिल्लांची ताटातूट होण्याची भीती आहे. त्यामुळे मादी पिल्लांना घेऊन येथून कधी निघून जाते याची वीज कर्मचारी आणि वन विभागाच्या अधिकार्यांना प्रतीक्षा लागली आहे.

भंडारदरा प्रकल्पातंर्गत कोदणी जलविद्युत प्रकल्प आहे. सध्या या प्रकल्पातून वीज निर्मिती बंद आहे. इतर कामकाज मात्र सुरू असल्याने 21 अधिकारी-कर्मचारी तेथे दिवसरात्र कार्यरत आहेत. 6 ऑगस्ट रोजी या प्रकल्पात एका बिबट्याने प्रवेश केला. तेव्हापासून कर्मचार्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. यथावकाश बिबट्याच्या मादीने चार पिलांना जन्म दिल्याचे लक्षात आले. पिल्लांच्या संगोपनासाठी मादी बिबट्याचा या परिसरातील वावर प्रकल्पाच्या सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाला आहे. त्यामुळे कर्मचार्यांची भीती आणखीच वाढली. त्यानंतर त्यांनी वन विभागाला कळविले. वन विभागाचे अधिकारी आले; त्यांनी पिंजरा लावला. मात्र, त्यात बिबट्या अडकला नाही. मात्र, असे करणे पिल्लांच्या द़ृष्टीने योग्य नसल्याने काळजी घेत काम करण्याच्या सूचना वन विभागाने प्रकल्पातील कर्मचार्यांना केल्या. रात्रपाळीच्या कर्मचार्यांना विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आले. त्यामुळे दुपारी 4 नंतरच प्रकल्पात शुकशुकाट होतो. रात्रपाळीचे कर्मचारी कॅबिन बंद करून बसतात.

पंधरा दिवसांत मादी पिल्लांना घेऊन जाते. त्यामुळे प्रकल्पाचे प्रवेशद्वार बंद न करता उघडे ठेवून त्यांना जाता येईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना वन विभागाने प्रकल्पातील कर्मचार्यांना दिल्या आहेत. आता सर्वजण आई आणि पिल्लांच्या तेथून जाण्याची वाट पाहत आहेत. वनक्षेत्रपाल जी.जी.गोंदके, डॉटसन वीज केंद्राचे अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सर्व कर्मचार्यांना सूचना दिल्या असून, सीसीटीव्हीद्वारे हालचालींवर नजर ठेवली जात आहे.

