गायत्री कंपनीविरोधात सहा दिवसांपासून व्यावसायिकांचे उपोषण कोट्यवधी रुपये थकवून कंपनीची गाशा गुंडाळण्याची तयारी

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून अंतिम टप्प्यात आले असताना गायत्री कंपनीकडे काम करणार्‍या व्यावसायिकांना थकीत बिले दिले नाहीत. व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपये थकवून गायत्री कंपनीने गाशा गुंडाळण्याची तयारी सुरू केली असल्याचे लक्षात येताच व्यावसायिकांनी गायत्री कंपनीचे प्रवेशद्वार बंद करत आंदोलन सुरू केले.

कंपनीकडे व्यावसायिकांचे 19 कोटी रुपये थकले असल्याची माहिती सुधाकर होन व बाजीराव होन यांनी दिली आहे. यामुळे व्यावसायिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून आपले पैसे काढण्यासाठी त्यांनी प्रशासनाला साकडे घातले आहे. परिसरातील व्यावसायिक व शेतकर्‍यांनी आपल्या जमिनी विकून समृद्धी महामार्गाचे काम करण्यासाठी डंपर, ट्रॅक्टर, जेसीबी क्रेन आदी वस्तू बँक, फायनान्स, पतसंस्था यांच्याकडून कर्ज काढून घेतल्या. सुरुवातीला एक-दीड वर्ष गायत्री कंपनीने या व्यावसायिकांना मिळालेल्या कामाचा मोबदला दिला. मात्र नंतर गायत्री कंपनीने या व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपये थकवले.

आपले थकलेले पैसे काढण्यासाठी व्यावसायिकांनी वेळोवेळी गायत्री कंपनीचे प्रवेशद्वार बंद आंदोलन, उपोषण आंदोलन केले. मात्र आता गायत्री कंपनीकडूननही दुसर्‍या कंपनीकडे हे काम गेल्यामुळे या कंपनीने परिसरातील व्यवसायिकांचे पैसे थकविण्यास सुरुवात केली. 19 कोटी रुपये या कंपनीने सध्या थकवले आहेत. कष्टाचे पैसे आपल्याला मिळाले पाहिजे यादृष्टीने त्यांनी एकत्र येत कंपनीचे प्रवेशद्वार बंद करून प्रशासनाला याबाबत निवेदन दिले आहे. सहा दिवसांपासून गायत्री कंपनीच्या कार्यालयासमोर चक्री उपोषण व्यवसायिकांनी सुरू केले आहे.

नाशिक येथे समृद्धीचे एमएसआरडीसीचे महाव्यवस्थापक मोपोवार यांच्याशी याबाबत व्यवसायिकांनी संपर्क केला. प्रत्यक्ष भेट घेतली असता त्यांनी केवळ तोंडी आश्वासन दिले. येत्या दोन दिवसांत जर गायत्री कंपनीने थकविलेले पैसे दिले नाही तर राज कन्स्ट्रक्शन कंपनीला देखील कोपरगाव परिसरात काम करून देणार नसल्याचा इशारा व्यावसायिकांनी दिला आहे.

Visits: 106 Today: 2 Total: 1111939

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *