स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचा रविवारी संगमनेरात नागरी सत्कार!

नायक वृत्तसेवा, संगमनेर
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या कोषाध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचा रविवारी (ता.17) संगमनेरात नागरी सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी ते उपस्थितांना श्रीराम जन्मभूमीवर उभ्या रहात असलेल्या दिव्य मंदिराच्या विस्तृत माहितीसह देशाची अस्मिता असलेल्या या तीर्थस्थळासाठी गेली पाच शतके झालेल्या संघर्षाचा ओझरता इतिहासही मांडणार आहेत. मालपाणी लॉन्स येथे होणार्‍या या कार्यक्रमाला संगमनेरकर श्रीरामभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर शरयू तीरावरील श्रीराम जन्मस्थळी भव्य मंदिर उभारण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. त्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची स्थापना करण्यात आली असून संगमनेरचे कर्मयोगी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांची कोषाध्यक्षपदी निवड झाली आहे. ही निवड संगमनेरकरांसाठीच नव्हे तर संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यासाठी गौरवास्पद आहे. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे जन्मलेल्या गोविंददेव गिरीजींनी आपल्या अध्यात्मिक कार्याची सुरुवात संगमनेरातून केली. आपल्या ओजस्वी वाणीतून विविध पौराणिक कथांचे निरुपण करतांना त्यांनी देश-विदेशात हिंदु संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्यात मोलाची भूमिका बजावली.

कोट्यावधी नागरिकांची आस्था असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांची जन्मभूमी तब्बल पाचशे वर्षानंतर मुक्त झाल्याने आतात तेथे भव्य आणि दिव्य मंदिर उभारणीचे कार्य सुरु होणार आहे. त्यासाठी देशभरातून निधी संकलनाचा उपक्रम हाती घेण्यात आला असून संगमनेरातही या कार्याची सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने संगमनेरात येत असलेल्या स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचा संगमनेरकरांच्यावतीने नागरी सत्कार केला जाणार असून या कार्यक्रमात स्वामीजी रामजन्मभूमीवरील मंदिराची भव्यता आणि त्यामागील रामभक्तांच्या रक्तरंजीत इतिहासावरही दृष्टीक्षेप टाकणार आहेत. रविवारी (ता.17) सायंकाळी पाच वाजता मालपाणी लॉन्स, कॉलेज रोड या ठिकाणी होत असलेल्या प्रेरणा सभेला संगमनेरातील श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी संकलन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Visits: 173 Today: 1 Total: 1959534

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *