संत गाडगेबाबांचा वारसा जपणारा संगमनेरातील अवलिया ‘आदित्य घाडगे’! स्वच्छता, निसर्गाची पूजा व रक्तदान करुन आजच्या तरुणांना देतोय अनोखा संदेश

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संत गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित होऊन झपाटल्यागत कार्य करणार्या संगमनेर शहरातील आदित्य दीपक घाडगे या अवलियाने आत्तापर्यंत 35 धार्मिक स्थळांची स्वच्छता करुन 300 मृत पशु-पक्ष्यांची योग्य विल्हेवाट लावली आहे. त्याचबरोबर निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवडीबरोबर पशुपक्ष्यांच्या चार्यापाण्याचीही सोय केली आहे. त्याच्या आधुनिक युगातील सामाजिक उत्तरदायित्वाची अनेक संस्थांनी दखल घेत गौरव केला आहे. त्याच्या उमेदीतील उल्लेखनीय कार्याचा दैनिक नायकने घेतलेला हा छोटासा धांडोळा.

शहरातील घाडगे या सर्व सामान्य कुटुंबातील 32 वर्षीय आदित्य घाडगे या तरुणाचे हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए असे उच्च शिक्षण घेतलेले आहे. सध्या एका दूध डेअरीत नोकरी देखील करत आहे. परंतु, संत गाडगेबाबांच्या विचारांचा प्रभाव पडल्याने त्यांचा समृद्ध वारसा नेटाने पुढे नेण्याचा ऐन उमेदीत ध्यास घेतला आहे. त्यानुसार नोकरी सांभाळून सामाजिक उत्तरदायित्वाच्या कर्तव्यातून आदित्य सतत सामाजिक कार्यात व्यस्त असतो. आत्तापर्यंत 35 धार्मिक स्थळांची स्वच्छता करुन संपूर्ण परिसर चकचकीत केला आहे. तर कधी रक्तदान करुन अनेकांना जीवदान दिले आहे. संत तुकारामांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, पक्षीही सुस्वरे आळविती’ या अभंगानुसार निसर्ग हाच देव मानून निसर्गाची पूजा करत आहे. याद्वारे 0विविध अपघातांत मृत पावलेल्या सुमारे 300 पशुपक्ष्यांची योग्य विल्हेवाट लावली आहे. तर ठिकठिकाणी वृक्ष लागवड करुन निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पशुपक्ष्यांसाठी चार्यापाण्याची सोय केली आहे.

कोरोना महामारीनिमित्त घोषित केलेल्या टाळेबंदीच्या काळात नागरिकांनी अक्षरशः माहुली, कर्हे व एकल घाट आदी ठिकाणी अस्वच्छता केली होती. याची गंभीर दखल घेत आदित्यने त्याठिकाणी जात तासन्तास स्वच्छता करुन परिसर शोभनीय केला आहे. विशेष म्हणजे या कार्यासाठी आदित्य कुणाचाही मदत न घेता ‘एकला चलो रे’चा नारा देत झपाटल्यागत काम करत आहे. परंतु, घरच्यांचे पाठबळ मिळत आहे. कुटुंबातील सदस्यांचा वाढदिवस अनाथाश्रम व वृद्धाश्रमात जाऊन साजरा करत आहे. या माध्यमातून अनाथ व अबालवृद्धांच्या चेहर्यावरील आनंद अधिक काम करण्यास ऊर्जा देत असल्याची भावना तो व्यक्त करतो.

आधुनिक युगातील संत गाडगेबाबांचा समृद्ध वारसा नेटाने पुढे नेणार्या अवलिया आदित्यची अनेक संस्थांनी दखल घेत यथोचित सन्मान केला आहे. नुकताच स्वदेश सेवाभावी संस्थेनेही गौरव केला आहे. एकीकडे तंत्रज्ञानाच्या युगात अनेकजण मोबाइलच्या जाळ्यात अडकल्याचे दिसते. परंतु, आदित्यने या सर्वांना छेद ऐन उमेदीत नोकरी सांभाळत वेळेचा सदुपयोग करत सामाजिक कर्तव्याचा अनोखा संदेश दिला आहे. त्याच्या या सामाजिक कर्तव्याला दैनिक नायकच्या शुभेच्छा अन् सलाम!

माझी नोकरी विपणनची (मार्केटिंग) असल्याने सतत फिरावे लागते. संत गाडगेबाबा विचारांनी प्रेरित होऊन समाजसेवेचा वारसा मिळाल्याने स्वच्छता, रक्तदान, मृत पशुपक्ष्यांची विल्हेवाट व चारापाण्याची सोय, वृक्षलागवड आदी उपक्रम एकटाच राबवत आहे. हा वारया असाच यापुढेही नेटाने चालू ठेवणार आहे.
– आदित्य घाडगे (स्वच्छतादूत, संगमनेर)

