‘तुमचे दागिने’, ‘तुमचीच’ जबाबदारी! संगमनेर पोलिसांचे ‘अजब’ फर्मान; सोनसाखळी चोरांसमोर लोटांगण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
निवडणुकीच्या धामधुमीत शहरातील चोर्या, फोफावत चाललेले अवैध व्यवसाय, विद्यार्थीनींना छेडण्याचे प्रकार, त्यात भर म्हणून दिवसाआड महिलांचे गळे ओरबाडण्याचे प्रकार, सतत वाहतुकीच्या कोंडीने त्रस्त झालेले सामान्य नागरिक यातून शहराच्या सामाजिक स्वास्थाचे धिंदवडे निघालेले असताना त्यावर नियंत्रण मिळवणं सोडून संगमनेर पोलिसांनी चक्क सोनसाखळी चोरांसमोर लोटांगण घालीत शहरातून ‘दवंडी’ पिटण्यास सुरुवात केली आहे. एका खासगी निवेदकाकडून रिक्षाद्वारे गावभर फिरुन महिलांना सतर्क केले जात आहे. ‘अलिकडील काळात शहरात मोटार सायकलवर येवून महिलांच्या गळ्यातील दागिने लांबविण्याच्या घटना वाढत आहेत, महिलांनी सतर्क राहुन ‘आपल्या’ दागिन्यांची ‘काळजी’ घ्यावी’ असे आवाहन केले जात आहे. खरेतर आपल्याला राखण्यासाठी मिळालेल्या हद्दित कायद्याला सोडून कोणताही प्रकार घडणार नाही, तेथील गुन्हेगारी तत्वांवर कायद्याची जरब निर्माण करुन समाजातील महिला, पुरुष, मुलं, मुली आणि जनावरंही निर्भयपणाने कायद्याचे राज्य उपभोगतील याची संपूर्ण जबाबदारी त्या-त्या पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्यांची आहे. मात्र शहरात चोरी करण्यास कोणी धजावणारच नाही असंकाही करण्याचे सोडून या महाशयांनी ‘महिलांना स्वतःच्या दागिन्यांची स्वतःच काळजी घ्या’ असे फर्मान धाडले आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याला खूप वैभवशाली इतिहास आहे. या शहरात कर्तव्य बजावून गेलेल्या प्रत्येक अधिकार्याच्या सन्मानात वाढच झाली आहे. त्यामुळेच शहर पोलीस ठाण्यात वरीष्ठ दर्जाच्या पोलीस निरीक्षकांचीच नेमणूक केली जाते. आपल्या प्रदीर्घ सेवेच्या अनुभवातून या अधिकार्यांनी संगमनेरसारख्या मोठ्या काळा-गोरा इतिहास लाभलेल्या शहरात कायदेचे राज्य कायम राखून तेथील रहिवाशांना निर्भयपणाने जगता यावे असे वातावरण निर्माण करुन देण्याची अपेक्षा असते. मात्र शहर पोलीस त्यात अपयशी ठरत असल्याचे वारंवार समोर येत आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून निवडणुकांची धांदल सुरु असल्याने यासर्व गोष्टींकडे दुर्लक्ष झाले त्याचा फायदा घेत शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होण्यासह छोट्या-मोठ्या चोर्या, दुचाकी व भर वर्दळीच्या रस्त्यांवरुन महिलांच्या गळ्यातील दागिने लांबविण्याचे प्रकार, देखणी वास्तू म्हणून लौकीक असलेल्या बसस्थानकावरील चोरट्यांचे भय या घटनांचा आलेख कमालीचा उंचावला आहे.

शहरात घडणार्या घटनांचे जलद तपास लागावेत यासाठी काही पोलीस निरीक्षक ‘डीबी’ (डिटेक्टीव्ह ब्रँच) नावाचा पोलिसांचा एक गट तयार करुन त्यांना स्थानिक पातळीवर सर्वाधिकार दिले जातात. या शाखेकडून आजवर कोणत्या गुन्ह्यांचा तपास लागला हा मात्र संशोधनाचा विषय आहे. बर्याचवेळा डीबीतील कर्मचारी वसुलीतच अधिक व्यस्त असल्याच्याही चर्चा कानावर येतात. वतनांप्रमाणे विभाग वाटून घेतलेल्या या मंडळींचे शहराच्या कानाकोपर्यात सुरु असलेल्या प्रत्येक अवैधधंद्यावर नियंत्रण असते. पोलिसांना माहिती नाही असा एकही गैरप्रकार शहरात कोणी चालवू शकत नाही हे देखील वास्तव आहे. मात्र सामान्य माणसांना त्यापेक्षा स्वतःच्या सुरक्षेची अधिक काळजी असते.

त्यामुळे आपले पारंपरिक उद्योग सांभाळताना पोलिसांनी सामान्य नागरिकाला त्याची झळ बसणार नाही यासाठी उपयायोजना केली पाहिजे. मात्र ते सोडून शहर पोलिसांनी चक्क उंटावर बसूनच शेळ्या हाकण्यास सुरुवात केली आहे. शहरातील चोरीच्या वाढत्या घटना, सोनसाखळ्या लांबवण्याचे प्रकार यावर नियंत्रण मिळवून आरोपींना गजाआड घालण्याचे सोडून उलट नागरिकांनीच त्यांच्या मुद्देमालाची काळजी घेण्याचे अजब फर्मान संगमनेरच्या पोलीस निरीक्षकांनी बजावले आहे. त्यासाठी सोशल माध्यमाचा वापर करण्यासह एका खासगी निवेदकाद्वारा शहरातून दवंडीही पिटाळण्यात आली आहे. त्यात पोलिसांच्या वतीने ‘अलिकडील काळात मोटार सायकलवर येवून महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवण्याचे प्रकार वाढले आहेत. महिलांनी सतर्क राहुन आपल्या दागिन्यांची काळजी घ्यावी’ असे आवाहन केले जात आहे.

हा प्रकार म्हणजे पोलिसांनी चोरट्यांसमोर लोटांगण घालण्यासारखा आहे. यापूर्वी संगमनेर उपविभागाच्या पोलीस उपअधिक्षकपदी असलेल्या राहुल मदने यांनी प्रत्येक घटनेने बारकाईने विश्लेषण करुन, सीसीटीव्ही फूटेजच्या आधाराने श्रीरामपूरच्या वडाळा महादेव येथील खंग्या चव्हाण याची टोळी जेरबंद केली होती. त्यानंतर दीर्घकाळी संगमनेर तालुक्याच्या हद्दित सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या नाहीत. त्यांच्यानंतर आलेल्या सोमनाथ वाघचौरे यांनीही उपविभागात पोलिसांची जरब निर्माण केली. त्यांच्या काळातही अशा घटना खूप कमी झाल्या होत्या. मात्र आता त्यात गतीने वाढ होत असून चोर्यांसह आता मोटरसायकलवर येवून धुमस्टाईल महिलांचे गळे ओरबाडण्याचे प्रकार वाढले आहेत.

एका पोलीस उपनिरीक्षकासह अर्धाडझन कर्मचार्यांचा समावेश असलेली शहर पोलीसांची ‘डीबी’ असतानाही आजवर त्यांना एकाही सोनसाखळी चोरीचा तपास लावता आलेला नाही. मध्यंतरी ‘एलसीबीचे’ कारनामे समोर आले होते, खासदार नीलेश लंके यांच्या त्या विरोधातील आंदोलनानंतर बर्याच घडामोडी घडून वादळं शमलं होतं, ते अद्याप गौणच आहे. त्यातच आता संगमनेर शहरात पुन्हा एकदा सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होवू लागल्याने अन् त्यातील एकाही घटनेच्या मूळापर्यंत जाण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याने संशय बळावू लागला आहे. शहराची वाहतूक व्यवस्था अगदी लयाला गेली आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर तासा तासाला वाहतुकीची कोंडी क्रमप्राप्त आहे. मनाला वाटेल तेथे दुकानं, हातगाड्या, पथार्या, दुचाकी, चारचाकी वाहनांसह मनमानी रिक्षाथांबे यामुळे संगमनेर म्हणायलाच ‘वैभवशाली’ ठरतं आहे.

दोन दशकांपूर्वी शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी असलेल्या गोविंद पवार या ज्येष्ठ पोलीस निरीक्षकांची कारकीर्द आजही संगमनेरात चर्चीली जाते. त्यांच्या काळात शहरात दुचाकीवरुन ट्रिपलसीट जाण्याचीही कोणाची हिम्मत होत नसतं. चोर्या, घरफोड्या या गोष्टी नगण्य होत्याच, मात्र सोनसाखळ्या लांबवण्याचा असाप्रकार जन्मालाही नव्हता. त्यांच्यानंतरच्या 20 वर्षात तो सगळा इतिहास होवून शहरात आज सर्वत्र अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. घटनांचे तपासच लागत नसल्याने गुन्हेगारही निर्ढावले आहेत. राजापूर रस्त्यावरील पुलाजवळ वाटमारीच्या घटना वाढीस लागल्याचे समोर येवूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. डीबी नावाच्या स्वतंत्र शाखेकडून कोणताही दिलासा मिळत नसल्याने ती बरखास्त करुन पोलीस निरीक्षकांनी स्वतः यासर्व गोष्टींकडे पाहण्याची गरज आहे. मात्र यागोष्टी सोडून त्यांनी चक्क महिलांनाच काळजी घेण्याचे फर्मान सोडल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे.

एकीकडे राज्यसरकाने राबविलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा’ राजकीय लाभ मिळाल्याने मनोधैर्य वाढलेल्या नेत्यांकडून महिलांचे गुणगणान गायले जात आहे. तर, दुसरीकडे त्याच नेत्यांच्या राज्यातील संगमनेर शहरात महिलांना मात्र निर्भयीपणाचे वातावरण देण्याचे सोडून त्यांचे पोलीस ‘तुमचं तुम्हीच पहा..’ असं फर्मान सोडीत असल्याने शहरातून आश्चर्य व्यक्त होत आहे.

