दामदुप्पट रकमेचे आमिष दाखवून 6 कोटी 81 लाखांना गंडा! तक्रारदारांच्या फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील सोनई व परिसरात चार संस्थांची नावे घेत एका वर्षात दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून अनेक लाभधारकांना 6 कोटी 81 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याबाबतच्या फिर्यादीवरून सहा जणांवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सोनई व परिसरातील अनेक तक्रारदारांच्यावतीने अण्णासाहेब मिठ्ठू दरंदले (रा.सोनई) यांनी ही फिर्याद दिली आहे. विष्णू रामचंद्र भागवत (रा.दवंडगाव, जि.नाशिक), नीलेश जर्नादन कुंभार (रा.मंचर, जि.पुणे), सुरेश सीताराम घंगाडे (रा.तळेगाव, जि.पुणे), राजेंद्र वामन देशमुख, प्रवीण गंगाधर कवडे (रा.कोतूळ, ता.अकोले), शांताराम अशोक देवतरसे (रा.सोनई, ता.नेवासा) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
मुळा कारखाना परिसरातील अंजनी हॉटेल, संकेत हॉटेल (आळेफाटा) व शिर्डी येथे बैठक घेऊन उज्ज्वलम अॅग्रो, माऊली मल्टिस्टेट, संकल्पसिद्धी इंडिया प्रा. लि., प्रॉफिट टिचर फ्लाय हॉलिडे या संस्थेचे नाव सांगून एका वर्षात रक्कम दामदुप्पटचे आमिष दाखविण्यात आले. विमान प्रवासाने सहल व जमिनीचे आश्वासन देण्यात आले. संबंधितांनी 2017 ते 2019 दरम्यान पैसे जमा करून नेले. मोठी लालूच दाखवत संबंधितांनी योजनेचा प्रसार करण्यासाठी या भागातील काही प्रमुख व्यक्तींना हाताशी धरले होते. चार कंपनींच्या हस्तकांनी सोनई व परिसरातून मोठी रक्कम जमा करून नेली. एका वर्षात रक्कम दामदुप्पटचे आमिष असल्याने अनेकांनी यात पैसे गुंतवले होते. वर्ष उलटूनही रक्कम मिळाली नसल्याने सर्वांचेच धाबे दणाणले. पैसे मिळायची शक्यता नसल्याने अखेर फिर्याद दाखल करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे पुढील तपास करत आहेत.