संगमनेरच्या राजस्थान युवक मंडळाचे ऑनलाईन परिचय संमेलन यशस्वी ः सोनी महानगरांपेक्षा ग्रामीण भागातील वैवाहिक संबंध फायदेशीर ठरत असल्याचे निरीक्षण ः मालपाणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राजस्थान युवक मंडळाने आयोजित केलेले ऑनलाईन परिचय संमेलन समाजासाठी अतिशय उपयुक्त ठरले आहे. मागील दहा वर्षांपासून सुरु असलेला हा उपक्रम यापुढेही समाजहितासाठी सुरु ठेवावा असे प्रतिपादन अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे माजी अध्यक्ष रामपाल सोनी यांनी केले.

महाराष्ट्र माहेश्वरी सभेच्या सहयोगाने संगमनेरात पार पडलेल्या तीन दिवसीय परिचय संमेलनाचे उद्घाटन सोनी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलतांना त्यांनी वरील प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष श्रीकिशन भन्साळी होते. प्रदेश माहेश्वरी सभेच्या परिचय समितीचे प्रमुख श्रीकांत लखोटिया व अहमदनगर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष अनीष मणियार प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होते.

मंडळाचे अध्यक्ष व मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष मालपाणी यांनी आपल्या भाषणात परिचय संमेलनामागील सविस्तर भूमिका मांडली. सर्वांनी केवळ शहरांच्या दिशेने पळू नये. ग्रामीण शहरात विवाह संबंध करण्याचे अनेक फायदे आहेत. पत्रिका जुळवण्याचा हट्ट केल्याने अनेक चांगली स्थळे हातातून निसटून जातात. त्यामुळे विचार जरूर करा, पण त्याचा अतिरेक करू नका असे मालपाणी म्हणाले. मंडळाच्यावतीने विवाह जुळवण्यासाठी बनविलेले अ‍ॅप वापरण्यास सोपे आणि उपयुक्त असल्याने त्याचा अधिकाधिक वापर करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पुणे येथील रिश्ते धागे संस्थेचे अध्यक्ष धीरज मर्दा यांच्या तांत्रिक सहयोगामुळे संमेलन सर्वत्र पोहोचू शकले याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. प्रमुख अतिथी अनीष मणियार व श्रीकांत लखोटिया यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. सुमित आट्टल व उमेश कासट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर कल्याण कासट यांनी आभार व्यक्त केले.

Visits: 101 Today: 1 Total: 1105956

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *