राष्ट्रवादीच्या अंतर्गत परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर भूमिका घेऊ! जयंत पाटील यांची मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद; मुख्यमंत्र्यांशीही करणार चर्चा
मुंबई, वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सध्या दोन मोठे धक्के बसले आहेत. धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप आणि नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात झालेली अटक यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर सध्या विरोधक निशाणा साधत आहेत. दोन्ही मंत्र्यांचे राजीनामा घेतले जावेत अशी मागणी वारंवार केली जात आहे. दरम्यान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पक्षाच्या अंतर्गत परिस्थितीचा आढावा नक्की घेतला जाईल. आवश्यकता भासली तर मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करु. तथ्याच्या आधारे योग्य त्या भूमिका घेऊ, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांचे राजीनामे घेतले जाणार का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, राजीनामा कोणीतरी आरोप केला म्हणून देणं ही बाब होणार नाही. पण या बाबतीत आम्ही पक्ष स्तरावर योग्य ती चर्चा करणार आहोत. धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांना जर कोणी ब्लॅकमेल करत असेल, त्यांचा काही दोष नसेल तर राजीनामा घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही. संबंधित यंत्रणा जिथे त्यांनी तक्रार केली आहे त्यांच्याकडून सगळी माहिती घेतल्यानंतर त्या यंत्रणा भूमिका घेतील, त्यानंतर आम्ही विचार करु.
नवाब मलिक यांच्याबाबतीत बोलायचं गेल्यास त्यांच्या जावयाने केलेली एखादी चूक असेल, केलीय की नाही ते माहिती नाही, ते चौकशी दरम्यान कळेल. पण त्यांच्या सासर्यावर परिणाम होण्याचं काही कारण नाही. या दोन्ही प्रकरणात सरकार कोणताही हस्तक्षेप करत नाही, असंही यावेळी त्यांनी सांगितलं. दरम्यान जयंत पाटील यांना यावेळी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेसंबंधी प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना माझ्यापर्यंत तर तशी कोणतीही चर्चा आलेली नाही सांगत जयंत पाटील यांनी उत्तर देणं टाळलं.