श्रीरामपूरमध्ये अंगणवाडी सेविकांचे मोबाईल वापसी आंदोलन सरकारने दिलेले मोबाईल तांत्रिकदृष्ट्या निकृष्ट; बालविकास विभागाला दिले निवेदन

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शासकीय कामासाठी सरकारने दिलेले मोबाईल तांत्रिकदृष्ट्या निकृष्ट आहेत. त्यामुळे ते वापरताना अनेक अडचणी येतात, असा आरोप करत अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता.20) शेकडो अंगणवाडी कर्मचार्‍यांनी आंदोलन करून एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पामार्फत मोबाईल सरकारकडे परत केले.

यावेळी संघटनेचे सरचिटणीस राजेंद्र बावके, अध्यक्षा मदिना शेख, जीवन सुरुडे, शरद संसारे, अंगणवाडी कर्मचारी रतन गोरे, इंदूबाई दुशिंग उपस्थित होते. यावेळी बालविकास विभागाच्या सहायक प्रकल्पाधिकारी सी. व्ही. भारती, पर्यवेक्षिका एम. जी. राजळे, पी. बी. बडाख, सीमा विभुते यांना निवेदन व मोबाईल देण्यात आले. बावके म्हणाले, सन 2019 मध्ये सेविकांना दिलेल्या मोबाईलची वॉरंटी मे 2021 मध्येच संपली. त्यामुळे सेविकांनी 17 ऑगस्टपासून प्रकल्प कार्यालयात मोबाईल परत करण्याचे आंदोलन सुरू केले. सरकारने दिलेल्या मोबाईलचा वापर अंगणवाडी सेविका लाभार्थींची नावे, हजेरी, वजन, उंची, स्तनदा व गर्भवती माता, पोषण आहार वाटपाची माहिती भरण्यासाठी करतात. मात्र, क्षमता कमी असल्याने हे मोबाईल वारंवार नादुरुस्त होत. दुरुस्तीचा खर्च सेविकांकडूनच वसूल केला जातो.

सध्या अनेक सेविकांकडील मोबाईल नादुरुस्त आहेत. त्यामुळे सरकार जोपर्यंत चांगल्या दर्जाचे मोबाईल देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती बावके यांनी दिली. संघटनेच्या अध्यक्षा मदिना शेख यांनी कर्मचार्‍यांना मार्गदर्शन केले. आंदोलनात शोभा वीसपुते, निर्मला चांदेकर, इंदूबाई दुशिंग, मंगल निधाने, अश्विनी अभंग, अलका गायकवाड, अश्विनी कुलकर्णी, ताराबाई आसने, आशा बोधक, कडूबाई साळुंखे, मंदाकिनी शेळके यांनी सहभाग नोंदविला.

Visits: 5 Today: 1 Total: 30539

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *