मुख्यमंत्र्यांची संगमनेरकरांना संक्रांतीची गोड भेट! संगमनेर व अकोले तालुक्याचे भाग्य उजाळणार्या ‘महा’ प्रकल्पाचा अहवाल सादर करण्याचे आदेश..
वृत्तसंस्था, मुंबई
गेल्या तीन दशकांपासून केवळ आश्वासने आणि घोषणांमध्ये घुटमळत असलेला, संगमनेर तालुक्यातील शेतकरी, चाकरमानी व व्यावसायिकांना फायदेशीर ठरु शकणारा पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग आता दृष्टीपथात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कोविडच्या दृष्टचक्रातून बाहेर पडत विकासात्मक कामांकडे वळालेल्या मृख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री व वरीष्ठ अधिकार्यांसमवेत या बहुचर्चीत रेल्वेप्रकल्पाबाबत महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी या सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीत सादर करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले. संगमनेर व अकोले या डोंगरी आणि दुर्गम तालुक्यांच्या विकासात मैलाचा दगड ठरु शकणार्या या रेल्वेमार्गाचे निर्मितीच्या दिशेने आज आणखी एक पाऊल पडले आहे. मकरसंक्रातीच्या शुभसंध्येला आलेल्या या बातमीतून मुख्यमंत्र्यांनी संगमनेर, अकोलेकरांना जणू गोड भेटच दिली आहे.
राज्यातील अविकसित भागांना डोळ्यासमोर ठेवून तेथील प्रलंबित कामांना गती देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीच्या अजेंड्यातील पहिला विषय ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड’ रेल्वेमार्ग हाच होता. बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अॅड.अनिल परब, राज्यमंत्री सतेज पाटील, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिव तथा परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, वित्त विभागाचे अप्पर सचिव मनोज सौनिक, महसुल विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जायस्वाल व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
महारेलच्यावतीने जायस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांसमोर पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचे सादरीकरण केले. या मार्गावरील स्थानके, गोदामे, कंपन्यांसाठी दिलेले प्रस्ताव, कृषी वाहतुकीचा नकाशा याबाबत त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. पुणे व नाशिक ही दोन औद्योगिक महानगरे रेल्वेमार्गाद्वारे एकमेकांना जोडल्यास नगर जिल्ह्यातील संगमनेर व अकोले या दोन तालुक्यांना त्यांचा सर्वाधीक लाभ होईल. या दोन महानगरांमध्ये काम करणार्या चाकरमान्यांसाठीही हा रेल्वेमार्ग अत्यंत किफायतशिर ठरणार आहे. त्यासोबत पर्यटन क्षेत्राच्या विकासातही या रेल्वेमार्गाचे महत्त्व सिद्ध होणार आहे. संगमनेर व अकोले तालुक्यातील शेतीमाल जलदगतीने महानगरांपर्यंत पोहोचवता येणं सहज शक्य होणार असल्याने या दोन्ही तालुक्यातील शेतकर्यांसाठीही हा रेल्वेमार्ग समृद्धी घेवून येणार आहे.
गेल्या तीन दशकांपासून केवळ आश्वासने आणि घोषणांच्या गर्तेत अडकलेला हा प्रकल्प राज्याच्या पटलावर आल्यानंतर संगमनेरचे लोकप्रतिनिधी व विद्यमान महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यासाठी सरकारकडे सतत आग्रह धरला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांनी या प्रकल्पाचा आणखी जोरकसपणे पाठपुरावा केला, त्याचाच परिपाक मध्यंतरी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन महानगरांना जोडणारा हा रेल्वेप्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याने त्याच्या कामात निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन दिले होते. आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाबाबत विशेष बैठक बोलावून मंत्रीमंडळाच्या नियमीत बैठकीत या प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिल्याने तीन दशकांनंतर हा रेल्वेमार्ग दृष्टीपथात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यावेळी जायस्वाल यांनी भविष्यात राबविल्या जाणार्या राज्यातील अन्य काही रेल्वेप्रकल्पांची माहितीही उपस्थितांना दिली. यात जिल्ह्यातील रोटेगाव-कोपरगाव या रेल्वेमार्गाचा समावेश आहे.
गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून मागणी असलेल्या पुणे-नाशिक रेल्वेमार्गासाठी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ, शिरुरचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह अन्य काही राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनीही वेळोवेळी आपली ताकद पणाला लावली. राज्याच्या कक्षेत हा विषय आल्यानंतर संगमनेरचे लोकप्रतिनिधी बाळासाहेब थोरात यांनी या प्रकल्पाबाबत सतत पाठपुरावा केला. आता या रेल्वेमार्गाच्या प्रवासातील सर्वात मोठा टप्पा पूर्ण होत असल्याने तो दृष्टीपथात येवू लागला आहे. मंत्रीमंडळाने या प्रकल्पाला मंजूरी देताच येत्या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद केली जाईल व येणार्या काही वर्षात संगमनेरकरांचे अनेक वर्षांचे स्वप्नं प्रत्यक्षात उतरेल. मंजूरी मिळाल्यानंतर 2100 दिवसांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महारेलने यापूर्वीच जाहीर केलेले आहे. त्या दिशेने आज महत्वपूर्ण टप्पा गाठला गेला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संगमनेर व अकोलेकरांना मकर संक्रांतीची गोड भेटच दिली आहे.