संगमनेरातील एटीएमवर पुन्हा चोरट्यांचा डल्ला! गॅसकटरचा वापर; सुमारे तीस लाखांहून अधिक रक्कम घेवून पोबारा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पोलिसांच्या निष्क्रीयतेमुळे संगमनेरातील गुन्हेगार आणि त्यांच्याकडून घडणार्‍या विविध घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या श्रृंखलेत गेल्या काही वर्षात शहर व परिसरात घडत असलेल्या एटीएम फोडीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली असून आजवर डझनाहून अधिक एटीएम फोडून कोट्यवधी रुपयांची लुट झालेली असतांना यातील एकाही घटनेचा तपास लावण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा तशीच घटना समोर आली असून दिल्लीनाका परिसरातील अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम गॅसकटरच्या सहाय्याने फोडून त्यातील 30 लाख 58 हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लांबविली आहे. या प्रकाराने शहरातील एटीएमची सुरक्षा रामभरोसेच असल्याचे सिद्ध झाले आहे.


याबाबत समजलेल्या माहितीनुसार संगमनेर शहरातील अतिशय वर्दळीच्या तीनबत्ती चौकातील अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये आज पहाटेच्या सुमारास सदरची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी आसपास कोणीही नसल्याचा फायदा घेत सदरचे एटीएम गॅसकटरचा वापर करुन फोडले व त्यातील 30 लाख 58 हजार रुपयांची रक्कम घेवून पोबारा केला. सदरचे एटीएम फोडतांना त्यातील काही नोटाही जळाल्या आहेत, त्या अर्धवट जळालेल्या अवस्थेत मशिनच्या आसपास विखुरल्याचेही यावेळी दिसून आले.


याबाबतची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी जात पाहणी केली. सदरच्या एटीएमसह आसपासचे सीसीटीव्ही फूटेज मिळवण्याचे व त्यातून चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. वृत्त लिहेपर्यंत या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यासाठी बँकेचे अधिकारी पोहोचलेले नव्हते, मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी तपास सुरु केला असून ठसे तज्ज्ञांसह श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.


गेल्या काही वर्षात संगमनेरातील एक डझनहून अधिक एटीएम फोडण्यात आले असून आजवर त्यातून कोट्यावधी रुपयांची लुट झाली आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात एकामागून एक घटना घडूनही शहर पोलिसांना आजवर यातील एकाही घटनेचा शोध लावण्यात अपयश आल्याने प्रगत असलेल्या संगमनेर शहरातील विविध बँकांच्या एटीएम सेंटर्सची सुरक्षा रामभरोसेच असल्याचे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.


शहर पोलिसांच्या निष्क्रीयतेमुळे गेल्या काही कालावधीत संगमनेरातील गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच पोलिसांकडून कोणत्याही घटनेचा तपासच होत नसल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे मनोधैर्य उंचावले असून त्यातून अशा घटना सातत्याने घडत आहेत. विशेष म्हणजे वर्दळीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या तीनबत्ती चौकात रात्रीच्यावेळी ‘फिक्स पॉईंट’ म्हणून नेहमी बंदोबस्त असतो, मात्र गेल्या काही वर्षात शहराचे प्रभारी अधिकारी रात्री 10 वाजताच झोपी जात असल्याने पोलीस दलाची कार्यप्रणालीच बदलली असून शहराच्या कायदा व सुवय्वस्थेचा प्रश्‍न अतिशय गंभीर झाला आहे.

Visits: 24 Today: 1 Total: 117035

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *