उभ्या वाहनांच्या दाटीत हरवली संगमनेरची ऐतिहासिक बाजारपेठ! मुखाशीच उभी असतात असंख्य वाहने; पालिकेचे दुर्लक्ष व्यापार्यांच्या मुळावर..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या आर्थिक संपन्नतेचा प्रगल्भ इतिहास सांगणार्या संगमनेरच्या ऐतिहासिक बाजारपेठेवर विविध कारणांनी अवकळा पसरली आहे. अगदी शिवकाळापूर्वी पासूनच्या पाऊलखुणा सांगणार्या या बाजारपेठेतील अरुंद रस्त्यामुळे आधीच येथील व्यावसायिकांचे कंबरडे मोडलेले आहे. त्यातच शास्त्री चौक ते तेलीखुंट या अतिशय अरुंद रस्त्यावर वाहन उभे करण्यास जागाच नसल्याने अनेकांनी आपली खासगी वाहने पालिकेच्या समोरील चौकातच उभी केली आहे. त्यामुळे संगमनेरच्या ऐतिहासिक बाजारपेठेचा श्वासच कोंडला गेला असून हा परिसर पार्किंगमुक्त करण्याची मागणी आता समोर येवू लागली आहे. पालिका व पोलिसांनी हा विषय गांभिर्याने घेवून वाहनांच्या गर्दीत महत्त्व हरवू लागलेल्या या ऐतिहासिक बाजारपेठेचा जीव वाचवावा अशी अपेक्षा बाजारपेठेतील व्यापारी व रहिवाशांमधून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील प्रगत शहरांत अग्रणी असलेल्या संगमनेर शहरातील व्यापार उदीम व्यापक आहे. लाल बहाद्दूर शास्त्री चौक ते तेलीखुंटापर्यंतचा परिसर म्हणजे पूर्वी संगमनेरची मुख्य बाजारपेठ समजली जायची. मात्र गेल्या दोन दशकांत दूरदृष्टीच्या अभावातून व्यापार्यांनी केलेली बांधकामे, अरुंद रस्ते, वाहनांच्या पार्किंगकडे झालेलेे दुर्लक्ष, वाहनांची सातत्याने वर्दळ, वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी, दुकानांपुढे दुकान मांडण्याची व्यापार्यांची मानसिकता आणि त्यात भर म्हणून अरुंद असूनही या रस्त्यावर फेरविक्रेत्यांसह भाजी विक्रेत्यांनी भर रस्त्यातच मारलेल्या पथार्या यामुळे संगमनेरातील सर्वाधिक बेशिस्तीचे दर्शनही संगमनेरच्या या ऐतिहासिक बाजारपेठेत घडते. या सगळ्यांचा परिपाक म्हणजे अगदी शिवकाळाच्या पूर्वीपासून अनन्य महत्त्व असलेल्या या बाजारपेठेचे विकेंद्रीकरण होण्यात झाले.
दीड दशकांपूर्वी संगमनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी भारतीय प्रशासन सेवेतील धडाडीचे अधिकारी प्रवीण गेडाम यांची तीन महिन्यांसाठी नियुक्ती झाली होती. या छोट्याशा कारकीर्दीत त्यांनी संगमनेर नगरपरिषदेच्या असंख्य भूखंडांवर वर्षोनुवर्ष उभी असलेली जवळपास सर्व अतिक्रमणे हटवून संगमनेर शहराचा श्वास मोकळा करण्यासोबतच पालिकेला आपल्या मालकीच्या भूखंडांची मोजदादही करुन दिली होती. याच दरम्यान येथील ऐतिहासिक बाजारपेठेचे महत्त्व लक्षात घेवून त्यांनी व्यापार्यांची बैठक घेत भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. आपणास विशेषाधिकार असून व्यापार्यांनी एकमत करुन शास्त्री चौक ते तेलीखुंटापर्यंत दोन्ही बाजूला आपणास किमान पाच फुट जागा देण्याची सूचना त्यांनी केली होती. आज आपणास आपले नुकसान होत असल्याचे वाटत असले, तरीही भविष्याच्या द़ृष्टीने ते आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
मात्र त्यांच्या सूचनेतील गांभीर्य आणि भविष्याचा विचार बाजारपेठेतील व्यापार्यांना समजलाच नाही. त्यामुळे काही व्यापारी सोडता बहुतेक व्यापार्यांनी त्यांच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम नंतरच्या कालावधीत बाजारपेठेतील व्यापार्यांनी घेतला, जो आजही कायम आहे. गेल्या दहा-बारा वर्षात संगमनेरात दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढली आहे. कधीकाळी एका कुटुंबात एखादे वाहन असायचे, आज मात्र घरात जेवढी माणसं आहेत, तितकीचं वाहनंही आहेत. त्यातच खरेदीसाठी बाहेर पडणार्या प्रत्येकाला आपले वाहन दुकानाच्या बाहेरच लावायचे असते. त्यामुळे जेथे वाहने उभी करण्याची व्यवस्था आहे, त्या दुकानातच जाण्याची ग्राहकांची मानसिकता वाढीस लागली. त्याचा परिणाम बाजारपेठेतील ग्राहकसंख्येवर होवू लागला.
त्यामुळे याच बाजारपेठेत असलेल्या काही आस्थापनांनी भविष्याचा विचार करीत बाजारपेठ सोडण्याचा विचार केला. त्यातून बाजारपेठेतील कापड दुकाने, सोन्या-चांदीच्या अलंकाराची दालने, सौंदर्य प्रसाधनांचे विक्रेते हळुहळू येथून बाहेर पडले आणि त्यांनी बाजारपेठेला समांतर असलेल्या शहराच्या हमरस्त्याला (मेनरोड) पसंदी दिली. मात्र बाजारपेठेतून मेनरोडला स्थलांतर करुनही कटारिया क्लॉथ स्टोअर्स व वाकचौरे शूज या दोन दालनांशिवाय अन्य व्यापार्यांनी ग्राहकांच्या वाहनांसाठी व्यवस्था न केल्याने आजचा बाजारपेठ समजला जाणारा मेनरोडही आपले महत्त्व गमावू लागला आहे. बाजारपेठेत वाहने उभी करण्यास जागाच नाही. पेठेतील बहुतेक व्यापार्यांची खाली दुकाने व वरच्या मजल्यावर निवासस्थाने आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या वाहनांनाही दारापुढे उभे करता येत नसल्याने असे अनेक व्यापारी आपली खासगी वाहने दुसर्यांच्या दारात उभी करुन निश्चिंत होतात. त्याचा सर्वाधिक फटका लालबहाद्दूर शास्त्री चौक आणि तेथून बाजारपेठेकडे येणार्या रस्त्यावरील व्यापारी व रहिवाशांना बसत आहे. या भागात उभी असलेली अनेक बहुतेक वाहने या चौकाशी अथवा परिसराशी कोणताही संबंध नसलेल्या नागरीकांची आहेत. त्यामुळे येथे वाहने उभी करतांना अनेकवेळा भांडणेही होतात. मात्र पर्यायच नसल्याने त्यात आजवर कोणताही बदल झालेला नाही.
लालबहाद्दूर शास्त्री चौक म्हणजे ऐतिहासिक संगमनेर नगरपालिकेचे प्रवेशद्वारच. मात्र या चौकात दिवसोंदिवस धूळखात अनेक वाहने बिनधास्तपणे उभी केलेली असल्याने या चौकाची आणि पर्यायाने पालिकेची रयाच गेली आहे. या चौकाशी संबंध नसलेल्यांनी येथे वाहने उभी करु नयेत यासाठी येथील रहीवाशी नेहमीच आक्रमक असतात, प्रत्यक्षात पालिका आणि पोलिसांना मात्र याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याने थोडेफार महत्त्व शिल्लक असलेल्या या ऐतिहासिक बाजारपेठेचे राहिलेले महत्त्वही शेवटाकडे जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
शहराच्या गावठाण भागात पालिकेच्या मालकीचे काही भूखंड आहेत. या भूखंडांवर वाहनतळं उभारले जावू शकतात. मात्र पालिकेकडे नियोजन आणि दूरदृष्टीचा अभाव असल्याचेही सातत्याने समोर आले आहे. पालिकेकडून विकासकामांच्या नावाने सुशोभिकरणावर आणि इतर कामांवर कोट्यावधीचा खर्च सुरु आहे. मात्र तो दीर्घकाळ टिकवण्यासाठीची कोणतीही योजना नसल्याने आज झालेले काम उद्या दिसेल का? याची कोणतीही खात्री नाही. स्वच्छ राजकारणात असंख्य लोकांच्या समाधानासाठी काही लोकांची नाराजी पत्करावीच लागते हे सूत्रही पालिकेला कडू वाटत असल्याने आहे त्या स्थितीत कोणतीही सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे अग्रणी असूनही शहराचा विकास मात्र काळवंडलेलाच आहे.