थोरातांनी उभे केलेले ‘सहकाराचे मॉडेल’ सर्व राज्यांसाठी उपयुक्त ः बघेल आवटे, डिसले व कानवडे यांना शानदार कार्यक्रमात पुरस्कार प्रदान
नायक वृत्तसेवा, संगमनेर
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याने शेतीमालाचे भाव वाढून शेतकर्यांना फायदा न होता भांडवलदार व व्यापार्यांना फायदा झाला. कृषीप्रधान भारतात केंद्र सरकार शेतकर्यांचे हाल करत असून हे दुर्देवी आहे. महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळीतून ग्रामीण विकास झाला असून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उभे केलेले सहकाराचे मॉडेल हे छत्तीसगडसह देशातील सर्व राज्यांसाठी उपयुक्त ठरेल असे गौरवोद्गार छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी काढले आहे.
संगमनेरातील मालपाणी लॉन्स येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे होते. तर व्यासपीठावर महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, लहू कानडे, डॉ.किरण लहामटे, माजी आमदार नरेंद्र घुले, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, रणजीतसिंह देशमुख, बाजीराव खेमनर, दुर्गा तांबे, राजेश मालपाणी, सचिन गुजर, करण ससाणे, डॉ.राजीव शिंदे, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, लक्ष्मण कुटे, विजय बोराडे, उत्कर्षा रूपवते, प्राचार्य केशव जाधव, प्रा.बाबा खरात, राजेश मालपाणी, इंद्रजीत थोरात, सेवा दलाचे विलास औताडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने ज्येष्ठ संपादक संजय आवटे यांना तर हरितक्रांतीचे प्रणेते डॉ.आण्णासाहेब शिंदे पुरस्काराने ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजीत डिसले यांना आणि सहकारातील कार्यकर्ता या पुरस्काराने अॅड.माधव कानवडे यांना गौरवण्यात आले. 1 लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
पुढे बोलताना मुख्यमंत्री बघेल म्हणाले, महाराष्ट्र ही स्वतंत्रता आंदोलनाची भूमी असून या राज्याने देशाला विचार दिले आहेत. सहकार चळवळ ही येथील विकासाचा गाभा आहे. संगमनेरचा सहकार हा मॉडेल व सर्वांसाठी उपयुक्त आहे हा प्रयोग छत्तीसगडमध्ये आपण राबवणार असून देशालाही मार्गदर्शक ठरणार आहे. देशात सध्या शेतकरी व कामगार विरोधी धोरण राबवले जात असून दिल्लीच्या वेशीवर चाळीस दिवस शेतकरी आंदोलन करतात. मात्र केंद्र सरकार त्यांच्याकडे परस्पर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. खरे तर केंद्र सरकारने छत्तीसगड सरकारचे मॉडेल राबवले पाहिजे. खासदार राहुल गांधी यांनी दिलेली न्याय योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली गेल्याने या राज्यात विकासाला गती मिळाली असल्याचे शेवटी नमूद केले.
जलसंपदा मंत्री पाटील म्हणाले, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचा समृद्ध वारसा बाळासाहेब थोरात हे सांभाळत आहेत. मला कधीही थोरातांचा फोन आला की पहिले निळवंडेचे काम आहे असेच वाटते. स्व.भाऊसाहेब थोरात, मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण व कालव्यांसाठी ध्यास घेतला असून येत्या 2024 पर्यंत कालव्यांची कामे पूर्ण करून पाणी देणारच आहोत. पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी करणे हाच महाविकास आघाडी सरकारचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट केले.
तर महसूल मंत्री थोरात म्हणाले, मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी भाजपला धडा शिकवत मोठा दैदीप्यमान विजय मिळवून छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेवर आणले. त्यांच्या पाठोपाठ महाराष्ट्रात राष्ट्रवादी-शिवसेना आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. यामध्ये जयंत पाटील यांचाही मोठा वाटा राहिला. खरे तर महाराष्ट्रात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, डॉ.अण्णासाहेब शिंदे, तीर्थरुप भाऊसाहेब थोरात यांनी घातलेल्या पायामुळे व केलेल्या कामामुळे आज आपण आनंदी जीवन जगत आहोत. हाच वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे. अडचणीच्या काळात संजय आवटे यांनी पुरोगामी विचार कायम जोपासला असून रणजीतसिंह डिसले यांनी प्राथमिक शिक्षकांना ग्लोबल चेहरा मिळवून दिला आहे. तर माधवराव कानवडे यांच्या काळात सहकारातील महत्त्वाचे कार्यकर्ते असून त्यांच्या कार्यकाळात झालेल्या नवीन कारखाना निर्मितीचा निर्णय अत्यंत ऐतिहासिक ठरला आहे.
यावेळी शंकर खेमनर, दिलीप शिंदे, अमित पंडीत, रामदास वाघ, मीरा शेटे, सुनंदा जोर्वेकर, नवनाथ अरगडे, संपत डोंगरे, रामहरी कातोरे, विश्वास मुर्तडक, जगन्नाथ घुगरकर, भास्कर पानसरे उपस्थित होते. प्रास्ताविक नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी आभार मानले. यावेळी राज्य, जिल्हा व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.