निळवंडे कालव्यांची कामे जलदगतीने पूर्ण करा ः पाटील जलसंपदा मंत्री जयंत पाटील व महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी केली धरणाची पाहणी

नायक वृत्तसेवा, अकोले
राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे बुधवारी (ता.13) धरणस्थळी भेट दिली. यावेळी निळवंडे कालव्यांच्या कामाची पाहणी करत काम जलदगतीने करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री पाटील यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

सदर भेटीवेळी मंत्री महोदयांनी म्हाळादेवी येथील कालव्यावरील सेतूच्या कामाची देखील पाहणी केली. तसेच निळवंडे धरणाच्या भिंतीवर जाऊन पाहणी केली. यावेळी निळवंडेचे कार्यकारी अभियंता भारत शिंगाडे यांनी प्रकल्पाची संपूर्ण माहिती आराखड्याच्या माध्यमातून दिली. यावरुन जलससंपदा मंत्री पाटील यांना निळवंडेच्या कामाची सद्यस्थिती अवगत झाली. त्यानंतर अधिकार्‍यांसमवेत बैठक घेत प्रकल्पग्रस्त व लाभक्षेत्रातील काही गावांतील प्रलंबित प्रश्न समजून घेतले. कामावरील सद्यस्थितीत उपलब्ध यंत्रसामुग्री व कामगार यांचा तपशीलही समजून घेतला.

दरम्यान, म्हाळादेवी गावातील प्रकल्पग्रस्तांच्या उतार्‍यावर असलेले महाराष्ट्र शासन नाव काढून टाकावे अशी मागणी शिवसेनेचे नेते प्रदीप हासे यांनी जलसंपदा मंत्री पाटील व महसूल मंत्री थोरात यांच्याकडे केली. दरवर्षी 500 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला तर जून 2023 पर्यंत काम पूर्ण होईल असा विश्वास निळवंडेचे कार्यकारी अभियंता भारत शिंगाडे यांनी व्यक्त केला. त्यावर मे 2023 च्या आत निळवंडे कालव्यांची कामे पूर्ण करण्यासाठी या कामावरील सर्व ठेकेदारांची बैठक आयोजित करावी अशी सूचना जलसंपदा मंत्र्यांनी केली.
रेडे, मेहेंदुरीसह अकोले तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांच्या मागण्यांसंदर्भात विचार करावा अशी सूचना आमदार डॉ.किरण लहामटे यांनी केली. कालव्यांची कामे करताना तालुक्यातील जे रस्ते खराब झाले असतील त्यांची दुरुस्ती करावी असेही सूचित केले. निळवंडे प्रकल्पातील एकही उपसा सिंचन योजना पूर्ण झाली नसल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांनी सांगितले. तसेच बिताका प्रकल्प संदर्भात लवकरच बैठक आयोजित करणार असल्याचे जलसंपदा मंत्री पाटील यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, मीनानाथ पांडे, ज्ञानदेव वाफारे, सुरेश गडाख, संपत नाईकवाडी, पाटीलबा सावंत, सुरेश खांडगे, भानुदास तिकांडे, महेश नवले, प्रदीप हासे, रवी मालुंजकर, अमित नाईकवाडी, अ‍ॅड.माणिक मोरे, तात्या ढेरे, भास्कर आरोटे, सुरेश मुंढे आदी कार्यकर्त्यांसह जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता (नगर) जी.बी.नान्नोर, लघु पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता संगीता जगताप, उपविभागीय अभियंता गणेश हारदे, मनोज डोके, भंडारदरा धरणाचे शाखा अभियंता अभिजीत देशमुख आदी अधिकारी उपस्थित होते.

Visits: 23 Today: 1 Total: 115154

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *