सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालयातील डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा!  वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला अश्‍लील टोमणे मारणे पडले महागात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या डॉक्टर पुनम निघुते आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी डॉक्टर योगेश निघुते याने आत्मसमर्पण केल्याच्या चर्चा सुरु असतानाच, संगमनेर शहरातील वैद्यकीय क्षेत्रातून आणखी एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. संगमनेरातील सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणीने महाविद्यालयातील डॉक्टर निमिष सराफ याच्या विरोधात महिलेला लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे कृत्य केल्याचा ठपका ठेवीत तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन शहर पोलिसांनी डॉक्टर सराफ याच्याविरोधात विनयभंगासह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या वृत्ताने जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरानजीकच्या संगमनेर खुर्द शिवारात असलेल्या सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालयात गेल्या मे महिन्यापासून ते 11 ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीत सिद्धकला रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात सदरचा प्रकार घडला आहे. याबाबत याच महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुंबईतील एका 26 वर्षीय तरुणीने संगमनेर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार वरील कालावधीत वेळोवेळी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कार्यरत असताना कोणतेही कारण नसताना डॉक्टर सराफ याने या तरुणीला अश्‍लील टोमणे मारुन तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य वारंवार केले. यादरम्यान त्याने सदर तरुणीला शिवीगाळ व मारहाण केल्याचेही दाखल झालेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दररोजच्या या सर्व प्रकारांना कंटाळलेल्या या तरुणीने मुंबईत परतल्यावर हा प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर त्यांच्यासह आज रोजी सदरच्या तरुणीने संगमनेर शहर पोलिस ठाण्यात स्वतः उपस्थित राहून पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यासमोर घडला प्रकार कथन केला. त्यावरुन सदर तरुणीची तक्रार दाखल करुन घेत त्यांनी सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालयातील डॉक्टर निमिष सराफ याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 354, 509, 504 व 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणात संबंधित डॉक्टरला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. संगमनेरसारख्या ग्रामीण शहरातून वैद्यकीय क्षेत्राला धक्के देणाऱ्या लागोपाठ दोन घटना समोर आल्याने जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
Visits: 217 Today: 1 Total: 1113466

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *