निमगाव खुर्दमध्ये शेतकर्यावर विळ्याचे वार; गंभीर जखमी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
आमच्या शेताच्या हद्दीत खुणा दाखविणारे सिमेंटचे पोल का मांडले? असे विचारले असता एकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करत आणि विळ्याचे वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द येथे मंगळवारी (ता.12) घडली आहे. या प्रकरणी तालुका पोलिसांत बुधवारी (ता.13) दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, निमगाव खुर्द येथील गोरक्ष यशवंत कासार हे शेतकरी मंगळवारी सकाळी आमच्या बांधावर तुम्ही हद्दीच्या खुणा दाखविणारे सिमेंट पोल का मांडले? असे विचारले असता तुमचे पोल हे आमचे हद्दीत आले आहे असे म्हणून अनिल त्र्यंबक कानवडे याने गोरक्ष कासार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर राजेंद्र त्र्यंबक कानवडे याने त्याच्या हातातील विळ्याने कासार यांच्या मानेवर व डाव्या हाताच्या मनगटावर वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी गोरक्ष कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी वरील दोघांविरोधात गुन्हा नोंद क्रमांक 25/2021 भादंवि कलम 326, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एम.आर.सहाणे हे करत आहे.