केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी व सहकारात संकट ः चव्हाण

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी व सहकारात संकट ः चव्हाण
सहकारमहर्षी थोरात कारखान्याच्या 54 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारात आदर्श तत्वे रुजविली. त्यांचे जनसामान्यांच्या विकासाचे संस्कार घेवून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे राज्यात यशस्वीपणे नेतृत्व करत आहे. सहकाराने ग्रामीण भागात नंदनवन फुलविले आहे. मात्र केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच राज्यातील शेतकरी व सहकार संकटात सापडला असल्याची टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.


सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 54 व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील होते तर अध्यक्षस्थानी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात होते. व्यासपीठावर खासदार राजीव सातव, आमदार डॉ.सुधीर तांबे, लहू कानडे, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव वामसी चांद रेड्डी, आशिष दुआ, बी. एम. संदीप, युवक काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, बाजीराव खेमनर, अ‍ॅड.माधव कानवडे, रणजीतसिंह देशमुख, मोहन जोशी, पृथ्वीराज साठे, कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, शंकर खेमनर, शिवाजी थोरात, बाळासाहेब साळुंखे, ज्ञानेदव वाफारे, मीरा शेटे, हेमंत ओगले, इंद्रजीत थोरात, सुनंदा जोर्वेकर, लक्ष्मण कुटे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.


पुढे बोलताना मंत्री चव्हाण म्हणाले, शेतकरी व गोरगरीब यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून सुशांतसिंह प्रकरण, रिया चक्रवती, टी. आर. पी. प्रकरण सुरू आहे. मागील 5 वर्षात केंद्राने आयात निर्णयासह सर्व धोरणे भांडवलदारांसाठीच घेतले आहे. सहकार मोडीत काढण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे अनेक साखर कारखाने बंद पडले आहेत. शेतकर्‍यांना एफआरपी दिली पाहिजे. मात्र उत्पादन खर्च धरुन साखरेची आधारभूत किंमत ठरवली जात नाही. त्यामुळे कारखाने अडचणीत आले आहेत. या कारखान्यांना महाविकास आघाडी सरकारने 500 कोटी रुपये कर्ज उपलब्ध करुन देण्याची हमी घेतली असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.


महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी पाटील म्हणाले, संगमनेरचा सहकार हा देशात मॉडेल ठरणारा आहे. सहकारातून ग्रामीण भागात नंदनवन झाले. शेतकरी समाधनी झाले असून, अडचणीच्या काळातही थोरात कारखान्याने लौकिक जपला आहे. दरवर्षी एफआरपी पेक्षाही 100 रुपये जादा भाव दिला. स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात हे देवरुपी माणूस होते. आदर्श संस्था व दूरदृष्टीतून त्यांनी हा विभाग समृद्ध करताना राज्यात महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांसारखे कर्तृत्ववान नेतृत्व दिले असल्याचे सांगून शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव मिळाला तर शेतकरी समाधानी होणार असल्याचे स्पष्ट केले.


मंत्री थोरात म्हणाले, थोरात कारखान्याने 800 टनापासून सुरुवात केली. पुढे 2000 मेट्रीक टन व 3500 मेट्रीक टनाची उभारणी केली. परंतु 5500 मेट्रीक टन व 30 मेगावॅट वीज निर्मितीसह नवीन अद्ययावत कारखान्याची उभारणी केली. हा निर्णय अत्यंत चांगला ठरला. या कारखान्याने कायम अडचणीतून मार्ग काढला आहे. एफआरपी पेक्षा जास्त भाव दिला आहे. कायम सभासदांसह बाहेरील शेतकर्‍यांचा विश्वास संपादन केला आहे. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला असल्याने शेतकर्‍यांनी एकरी 100 टन उसाचे उत्पादन घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.

Visits: 12 Today: 1 Total: 115231

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *