साकूर घटनेतील आरोपींना पाच दिवसांची कोठडी तिघांना झाली अटक; एकाला सोडले तर दुसरा अद्याप पसार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
साकूरमधील रुबाब नावाच्या पान टपरीमध्ये साडेपंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचर झाल्यानंतर तिने घरी जावून आत्महत्या केली. या घटनेने पुरोगामी महाराष्ट्रात खळबळ उडाली असून गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मुख्यआरोपी सौरभ रावसाहेब खेमनरसह त्याला मदत करणार्‍या दोघांना अटक केली आहे. या तिघांनाही न्यायालयाने 22 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पाचजणांची नावे समोर आली असून त्यातील एकाला चौकशीनंतर सोडून देण्यात आले आहे, तर पाचवा आरोपी विजय खेमनर पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी ठरला आहे.


 गेल्या महिन्यात 29 फेब्रुवारीरोजी इयत्ता दहावीत शिकणारी 15 वर्ष 8 महिने वयाची अल्पवयीन मुलगी दहावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र घेण्यासाठी साकूरमध्ये आली होती. मात्र दुर्दैवाने त्या दिवशी शाळेला सुट्टी असल्याने ती प्रवेशद्वारावरुनच माघारी परतली. घराकडे जाताना तिने परीक्षेसाठी लागणारे शालेय साहित्यही खरेदी केले. तेथून घरी जात असताना रस्त्यातील ‘रुबाब’ नावाच्या पान टपरीवर जमा झालेल्या टवाळखोरांमधील सौरभ रावसाहेब खेमनर (वय 21, रा.हिरेवाडी) या नराधमाने तिला भररस्त्यात आडवून अक्षरशः फरफटीतच पान टपरीत नेले.


त्याच्या अन्य साथीदारांनी टपरीचे शटर बंद केल्यानंतर आरोपीने पीडित मुलीच्या तोंडाला रुमाल आणि हाताला दोरी बांधून दोनवेळा तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. सकाळी 9 ते साडेअकरा असे अडीच तास चाललेल्या या दुष्कृत्यानंतर आरोपी खेमनरने कोणाला काही सांगितल्यास कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देत आपल्या साथीदारांना शटर उघडण्यास सांगितले. मात्र शटर उघडताच समोर उभ्या असलेल्या आपल्या कुटुंबाच्या परिचयातील बाजीनाथ दातीर व मैत्रिणीला पाहुन पीडित मुलगी भेदरली. घडलाप्रकार आपली आणि आपल्या कुटुंबाची गावात बदनामी करणारा ठरणार असल्याचीही त्या कोवळ्या जीवाला जाणीव झाली.


त्यामुळे घटनेनंतर काही वेळातच घरी पोहोचलेल्या पीडितेने आपल्या जन्मदात्या आईजवळ सगळा प्रकार कथन करुन विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या केली. ही घटना साकूरमधील टवाळखोरांचा उपद्रव आणि त्याला वारंवार बळी पडत असलेल्या अल्पवयीन मुलींचे जीवन दाखवणारी ठरली. घटनेनंतर तब्बल 18 दिवसांनी याबाबत फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी जलद तपास करीत मुख्यआरोपी सौरभ रावसाहेब खेमनर (वय 21), त्याला साहाय्य करणारे योगेश रामा खेमनर (वय 26, दोघेही रा.हिरेवाडी), प्रशांत भास्कर भडांगे (वय 24, रा.भडांगे वस्ती) व विकास रामदास गुंड (वय 24, रा.मांडवे बु.) या चौघांनाही रविवारी (ता.17) रात्रीच ताब्यात घेतले.


त्यांच्या चौकशीत विकास गुंड याचा प्रत्यक्ष घटनेशी संबंध नसल्याचे समोर आल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. तर सौरभ रावसाहेब खेमनर, त्याला साहाय्य करणारे योगेश रामा खेमनर व प्रशांत भास्कर भडांगे या तिघांनाही अटक करण्यात आली. सोमवारी (ता.18) या सर्वांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 22 मार्चपर्यंत पाच दिवस पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. तर या प्रकरणातील पाचवा आरोपी विजय खेमनर अद्याप पसार आहे. सोमवारी सकाळी त्याचे ‘लोकेशन’ मिळाल्यानंतर पोलीस पथक त्याच्यावर मागावर होते. मात्र ऐनवेळी त्याने हुलकावणी दिल्याने त्याला जेरबंद करण्यात अपयश आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *