पुणे-नाशिक रेल्वेमार्गाला संरक्षण विभागाचा ‘लाल कंदील’! लष्कराचा आक्षेप; युद्ध पातळीवर सुरू असलेले काम खेड तालुक्यात थांबले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
बहुप्रतिक्षीत पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाला निती आयोगासह केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर वेगात काम सुरु झाले होते. मात्र सदरचे काम खेड तालुक्यात पोहोचताच लष्कराने त्यावर आक्षेप नोंदवित काम बंद पाडले आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून वेगात सुरू असलेल्या कामाला लाल कंदील (रेड सिग्नल) मिळाला आहे. खेड तालुक्यातून जाणारा हा रेल्वेमार्ग भारतीय लष्कराच्या स्फोटके नष्ट करण्याच्या जागेतून जात असल्याने हा आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे प्राधिकरणाने लष्कराची जागा सोडून अन्य पर्यांयांचा विचार सुरू केल्याने नाशिक-पुणे या महानगरांदरम्यानच्या रेल्वेमार्गाचे स्वप्नं लांबले आहे.

गेल्या महिन्यात केंद्रीय निती आयोग आणि रेल्वे मंत्रालयाने एकाच दिवशी बहुप्रतिक्षीत असलेल्या पुणे-नाशिक रेल्वेमार्गाला अंतिम मंजुरी दिली होती. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून मिळणार्या 20 टक्के निधीचा मार्ग मोकळा झाल्याने महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून (महारेल) पुण्यापासून नाशिककडे वेगाने काम सुरू करण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र सदरच्या संरेखनाचे काम खेड तालुक्यात पोहोचताच भारतीय लष्कराने या रेल्वेमार्गावर आक्षेप घेतला. खेड तालुक्यातून जाणारा हा मार्ग लष्कराच्या स्फोटके नष्ट करण्याच्या जागेतून जात असल्याने हा आक्षेप नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे महारेलने खेडमधील काम थांबविले असून पर्यायी जागेचा शोध करण्यास सुरुवात झाली आहे.

यापूर्वी रेल्वेकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना संरक्षण विभागाकडून त्यावर कोणताही आक्षेप घेण्यात आलेला नव्हता. आता या रेल्वेमार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरु असताना लष्कराने स्फोटके नष्ट करण्याच्या कामात अडथळा ठरेल असे कारण सांगत त्यावर आक्षेप नोंदविल्याने महारेलला खेडमधील काम थांबवावे लागले आहे. आता पुणे प्रशासनाकडून संरक्षण विभागाची जागा सोडून पर्यायी जागेची पाहणी सुरू झाल्याने नियोजित वेळेपेक्षा हा रेल्वे प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच लांबण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, रेल्वे अधिकारी अजय जैस्वाल यांच्याशी चर्चा करुन त्यावर तोडगा काढणार आहेत.

महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाचा 16 हजार 39 कोटी रुपयांचा संयुक्त उपक्रम असलेल्या पुणे-नाशिक रेल्वेमार्गाची उभारणी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून (महारेल) केली जाणार आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या प्रत्येकी 20 टक्के निधीसह उर्वरीत 60 टक्के निधी खासगी क्षेत्रातून कर्जरुपाने उभे केले जात आहेत. पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातून जाणार्या या रेल्वेमार्गात पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर या चार तालुक्यातील 54 गावांचा समावेश असून आत्तापर्यंत त्यातील 40 गावांमधील जमिनीच्या मोजणीचे काम पूर्ण झाले आहे.

या रेल्वेमार्गासाठी आवश्यक असलेली जमीन शेतकर्यांकडून थेट खेरीदीखत करुन घेतली जाणार असून यात तीनही जिल्ह्यात पुण्याने आघाडी घेतली असून आत्तापर्यंत 26 खरेदीखतांची नोंदणी करण्यात आली आहे. या मार्गावर वंदेभारत ही स्वदेशी रेल्वेगाडी ताशी दोनशे किलोमीटर वेगाने धावणार असून त्यासाठी दुहेरी मार्गिका तयार करुन त्यांचे विद्युतीकरणही केले जाणार आहे. देशातील पहिलाच सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग ठरणार्या पुणे-नाशिक या प्रकल्पात एकूण 19 छोटे-मोठे बोगदे, 41 उड्डाणपूल व 128 ठिकाणी भूयारी मार्गांची रचना केली जाणार आहे. सध्या लष्कराच्या आक्षेपामुळे त्यात खोडा पडला असला तरीही लवकरात लवकर त्यावर तोडगा निघेल असा विश्वास महारेलकडून वर्तविण्यात आला आहे.

