पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख पुन्हा संगमनेर शहर पोलीस ठाण्यात! आज सकाळी पदभार स्विकारताच शहरातंर्गत रस्त्यांवर जाणवू लागले पोलिसांचे अस्तित्त्व..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
लाचखोर पोलीस कर्मचार्‍यामुळे पंधरा दिवसांपूर्वी चौकशीसाठी मुख्यालयात बोलावण्यात आलेले संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख आज (ता.29) सकाळी पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत. दिवाळीच्या दरम्यान पदभार स्विकारणार्‍या देशमुख यांनी पोलीस कर्मचार्‍यांना शिस्तीचे धडे देत मोठ्या कालावधीनंतर शहरात पोलिसांचे अस्तित्त्व दाखवण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांना मुख्यालयाचे बोलावणे आल्यावर त्याला शहरातून विरोधही झाला होता, मात्र अवघ्या पंधरा दिवसांतच ते पुन्हा कर्तव्यावर रुजू झाल्याने त्यांच्या बदलीनंतर ‘अदृष्य’ झालेले पोलीस आज सकाळपासूनच शहरातील रस्त्यारस्त्यावर दिसू लागले आहेत.


गेल्या 12 डिसेंबररोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक बापूसाहेब देशमुख याला ‘हरविल्या’च्या प्रकरणात लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शहर पोलीस ठाण्यातच रंगेहाथ पकडले होते. विशेष म्हणजे पो.नि.देशमुख यांनी दिवाळीच्या दरम्यान शहर पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यानंतर सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांची बैठक घेवून लाचखोरी व बेशिस्ती खपवून घेणार नसल्याचा सज्जड इशाराही दिला होता. त्यासोबतच परस्पर तडजोडी, प्रलंबित तपास याबाबतही त्यांनी कर्मचार्‍यांचे कान उपटले होते. त्यामुळे मोठ्या कालावधीनंतर पोलीस ठाण्यात शिस्तीचे पाट वाहत असल्याचे समाधानकारक चित्र अल्पावधीतच संगमनेरकरांना दाखवले होते.


शहर पोलीस ठाण्यातील त्यांच्या उपस्थितीत कोणताही अधिकारी वा कर्मचारी तडजोडी करण्यास धजावत नव्हता. याच दरम्यान 12 डिसेंबररोजी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी मुख्यालयात ‘गुन्हे बैठकीचे’ आयोजन केल्याने पो.नि.देशमुख बैठकीसाठी नगरला गेले होते. त्याचा फायदा घेत शहर पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस नाईक बापूसाहेब देशमुख याने एका हरविल्याच्या प्रकरणाचा तपास थांबवण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागीतली होती, ती स्विकारतांना नाशिकच्या एसीबीने त्याला अटक केली होती. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांनी 14 डिसेंबररोजी अकोल्यातील पोलीस हवालदारही लाचखोरीत पकडला गेल्याने तेथील पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्यासह पो.नि.देशमुख यांना चौकशीसाठी तात्काळ मुख्यालयात हजर होण्याचे आदेश बजावण्यात आले. तेव्हापासून हे दोन्ही अधिकारी मुख्यालयात होते.


अकोल्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार सध्या रजेवर असल्याने त्यांच्या पुनःनियुक्तिबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा शहर पोलीस ठाण्याचा पदभार हाती घेतला आहे. देशमुख कर्तव्यावर रुजू होताच गेल्या पंधरा दिवसांपासून काहीसे निवांत झालेले पोलीस कर्मचारी लगोलाग पोलीस ठाण्यात हजर झाले. बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा, नवीन नगर रस्ता अशा सर्व भागातून गायब झालेले वर्दीतले रक्षकही आज सकाळपासून दिसू लागले आहेत. त्यामुळे संगमनेरकर सामान्य नागरिक पुन्हा एकदा सुखावला आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी पदभार घेतल्यापासूनच पोलीस कर्मचार्‍यांना शिस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली होती. दररोज सकाळी 9 वाजता कर्तव्यावर हजर होणे, ठरवून दिलेल्या पॉईंटवर ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण थांबणे, चौकाचौकात बंदोबस्त ठेवणे, सरकारी वाहनातून कोविडच्या प्रादुर्भावाबाबत जागृती करण्यासोबतच बेशिस्त वाहनधारक व मास्क नसलेल्यांवर कारवाई करणे अशा कामांची नियमीत सवय लावण्याचा अट्टाहास केला होता. त्यांची मुख्यालयात बदली झाल्यानंतर त्यांनी दिलेली शिकवण येथील कर्मचारी विसरुन गेले होते. मात्र आज त्यांच्या पुनःनियुक्तिचे आदेश येताच शहरातील रस्त्यांवरुन ‘गायब’ झालेले ‘वर्दीतील’ पोलीस पुन्हा दृष्टीस पडू लागल्याने संगमनेरकरांनी समाधान व्यक्त केले आहे.

Visits: 208 Today: 2 Total: 1106822

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *